मुंबई : साऊथ सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार यांच्या  '2.0' या जबरदस्त अॅक्शन चित्रपटाने ऑनलाईन तिकीट बुकिंगमध्ये नवा विक्रम नोंदवला आहे. 'बुक माय शो' या वेबसाईट आणि अॅपनुसार '2.0'ची दहा लाखांपेक्षा जास्त तिकीटं आधीच बुक झाली आहेत.


रजनीकांत, अक्षय कुमार आणि अॅमी जॅक्सन यांची प्रमुख भूमिका असलेला '2.0' हा चित्रपट तामीळ, तेलुगू आणि हिंदीमध्ये गुरुवारी (29 नोव्हेंबर) देशभरात प्रदर्शित झाला. एस. शंकर दिग्दर्शिक 2.0 हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

रिव्ह्यू : चिट्टी आला रे आला..

'बुक माय शो'चे सीओओ (सिनेमा) आशिष सक्सेना यांच्या माहितीनुसार "2.0 च्या अॅडवान्स बुकिंगबाबत प्रेक्षकांमध्ये जबरदस्त उत्साह पाहायला मिळाला आहे. 2.0 हा या वर्षातील बहुप्रतिक्षीत सिनेमांपैकी एक होता आणि तिकीट बुकिंगमध्येही ही बाब स्पष्ट झाली आहे. आतापर्यंत दहा लाख तिकीटांची विक्री झाली आहे, ज्यात सिनेमाच्या तिन्ही भाषांचा समावेश आहे."

"अॅडवान्स बुकिंगच्या आकड्यांवरुन 2.0 हा चित्रपट कमाईचे विक्रम मोडणार असल्याचे संकेत मिळत आहेत," असं निर्मात्यांचं मत आहे. "जबरदस्त स्टारकास्ट, उत्तम दिग्दर्शक आणि खिवळून ठेवणारी कहाणी यामुळे सिनेमा बॉक्स ऑफिसवर विक्रमी कामगिरी करेल," असा विश्वास निर्मात्यांना आहे.