मुंबई : प्रदर्शनानंतरच 'राझी' चित्रपट बॉक्स ऑफिसवर शानदार कामगिरी करत आहे. रिलीजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी आलिया भट आणि विकी कौशलच्या या सिनेमाच्या कमाईत वाढ झाली आहे.

मेघना गुलजार दिग्दर्शित या सिनेमाने रविवारी 14.11 कोटी रुपयांची कमाई केली. तर विकेण्डला चित्रपटाने 32.94 कोटी रुपये कमावले.

'राझी'ने पहिल्या दिवशी 7.53 कोटी रुपयांचा गल्ला जमवला तर दुसऱ्या दिवशी सुमारे 50 टक्क्यांच्या वाढीसह सिनेमाने 11.30 कोटींची कमाई केली. ओपनिंग डेला सर्वाधिक कमाई करणारा 2018 वर्षातील हा पाचवा हिंदी चित्रपट ठरला.


उत्तम कथा, समीक्षकांकडून मिळालेले चांगले रेटिंग्स आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता येत्या काही दिवसात चित्रपटाची कमाई आणखी वाढण्याची आशा आहे.

1971 च्या भारत पाकिस्तान युद्धाची पार्श्वभूमी या सिनेमाला आहे. आलिया भटने यात गुप्तहेराची भूमिका यात साकारली आहे. आलिया पाकिस्तानी सैनिकासोबत लग्न करुन पाकिस्तानात जाते आणि तिथून भारतासाठी माहिती मिळवण्याचे काम करते. ज्या पाकिस्तानी सैनिकासोबत आलियाचं लग्न होतं, त्याची भूमिका अभिनेता विकी कौशलने केली आहे. एका धाडसी तरुणीची भूमिका आलियाने यात केली आहे.

आलिया भट आणि विकी कौशलशिवाय सिनेमात जयदीप अहलावत, शिशिर शर्मा, रजित कपूर, सोनी राजदान, आरिफ झकारिया आणि अमृता खानव‍िलकर यांसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

आल‍ियाचे वडील महेश भट यांनीही मुलीचा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स असल्याचं सांगितलं.