मुंबई: अभिनेता इंदर कुमारच्या निधनाला वर्ष होत आलं आहे. मात्र आता त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये इंदर कुमार आत्महत्या करणार असल्याचं स्वत: सांगत आहे. हा व्हिडीओ इंदर कुमारने मृत्यूच्या आदल्या दिवशी रेकॉर्ड केल्याचा दावा केला जात आहे.


इतकंच नाही तर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्याचे फॅन्स इंदर कुमारने आत्महत्या केल्याचा दावा करत आहेत.

सलमान खानसोबत ‘वॉन्टेड’ या सिनेमात सहकलाकाराच्या भूमिकेत दिसलेल्या अभिनेता इंदर कुमारचं गेल्या वर्षी हृदयविकाराने निधन झालं. इंदर कुमारने गेल्या वर्षी 28 जुलै 2017 रोजी अखेरचा श्वास घेतला.  इंदर कुमार आजारी होता, त्याचवेळी मध्यरात्री त्याला हार्टअटॅक आला.

43 व्या वर्षी इंदर कुमारला मृत्यूने गाठलं. त्यामुळे संपूर्ण बॉलिवूड हळहळलं.

आता त्याच्या निधनाला वर्ष होत आलं आहे. मात्र त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मृत्यूनंतरही प्रश्नचिन्ह

इंदर कुमारच्या मृत्यूनंतर त्याच्या मृत्यूच्या कारणाबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. इंदर कुमारला त्याच्या मृत्यूची जाणीव आधीच झाली होती असंही म्हटलं गेलं होतं.

व्हायरल व्हिडीओत काय आहे?

जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्या व्हिडीओमध्ये इंदर कुमार दारुच्या नशेत स्वत:ची परिस्थिती सेल्फी कॅमेऱ्यात सांगत आहे.

"माझी परिस्थिती पाहून तुम्ही आश्चर्यचकित झाला असाल, घाबरला असाल. मात्र ही सत्य परिस्थिती आहे, मी आत्महत्या करायला निघालो आहे.

याचा दोष मी कोणाला देऊ? चूक नव्हे अनेक चुका केल्या आहेत. मी नशेबाज, लंपट आज रस्त्यावर आलो आहे. मी सिक्सपॅक फाडू बॉडीसह अभिनेता बनण्यासाठी आलो होतो. मात्र माझ्या मस्ती/अय्याशीने रस्त्यावर आणलं.

माझ्या सल्ल्याने जर तुम्ही काही शिकू शकाल तर शिका, अन्यथा तुम्हीही रस्त्यावर याल. उद्या तुमच्या हातात मोबाईल असेल, तुम्हीही व्हिडीओ बनवत असाल, तुम्हीही मृत्यूचा संदेश देत असाल".

यानंतर इंदर कुमार पुन्हा दारु पिऊन हळवा होतो. त्यावेळी तो त्याच्या आईला संदेश देत आहे.

आई तू मला सर्वकाही दिलंस. मात्र आता मी काहीही करु शकत नाही. मला माफ करा. आता छोटू (लहान भाऊ)  तू मोठा भाऊ होशील. आता तर मी माफीलायकही राहिलो नाही.

VIDEO:




व्हायरल सत्य

खरंतर इंदर कुमारने मृत्यूच्या एक वर्ष आधी 2016 मध्ये इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. त्यावेळी त्याने फोटोसह ‘हॅपीनेस’ अशी कॅप्शन लिहिली होती. त्यानंतर इंदर कुमारने कोणतीही पोस्ट केली नाही.

मग त्याने मृत्यूच्या आदल्या दिवशी 27 जुलै 2017 रोजी स्वत:चा एक फोटो शेअर केला. त्यामध्ये त्याने पीस अर्थात शांती असं लिहिलं.

मात्र इंदर कुमारची ही पोस्ट ज्या अकाऊंटवरुन शेअर करण्यार आली आहे, ते अकाऊंट व्हेरिफाईड नाही.

दुसरीकडे काही रिपोर्टनुसार हा व्हिडीओ आत्महत्येशी संबंधित नाही, तर तो त्याचा आगामी सिनेमाचा भाग होता.

दरम्यान, या व्हिडीओबाबत इंदर कुमारची पत्नी लवकरच पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण देणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

महेश कोठारेंच्या 'माझा छकुला'वर आधारित 'मासूम' या हिंदी चित्रपटातून इंदर कुमारने पदार्पण केलं होतं. त्यानंतर सलमान खानसोबत तुमको ना भूल पाएंगे, वाँटेड यासारख्या चित्रपटात त्याने भूमिका केल्या होत्या. त्याने जवळपास 20 चित्रपटात काम केलं आहे. मृत्यूपूर्वी तो 'फटी पडी है यार' चित्रपटाचं शूटिंग करत होता.

संबंधित बातमी

मासूम, वाँटेड फेम अभिनेता इंदर कुमारचं निधन


मृत्यूपूर्वी काही तास अगोदर इंदर कुमारची पोस्ट, चाहतेही हळहळले