मुंबई : अभिनेता अजय देवगनच्या आगामी 'रेड' चित्रपटाबाबत चाहत्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. या सिनेमातून एक महिला कलाकार पदार्पण करणार आहे, जी कदाचित बॉलिवूडमधील सर्वात वयोवृद्ध 'न्यूकमर' ठरु शकते. 85 वर्षीय पुष्पा जोशी फीचर फिल्ममध्ये अभिनयाचा डेब्यू करत आहेत.


राज कुमार गुप्ता दिग्दर्शित 'रेड' चित्रपटात सौरभ शुक्लाच्या आईची व्यक्तिरेखा पुष्पा जोशी साकारत आहेत. वयाच्या 85 व्या वर्षी हे नवं आव्हान पेलण्याचं पुष्पा जोशींनी ठरवलं.

सेटवर पुष्पा यांना त्रास होऊ नये, याची सर्वतोपरी काळजी अजय देवगन घेत होता. पुष्पा यांच्या सीन्सना प्राधान्य मिळावं, यासाठी अजयचे प्रयत्न असायचे. रेड चित्रपटाच्या सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांनी त्यांची काळजी घेतली.

'पुष्पा जोशी अत्यंत लाघवी आहेत. सर्वांनाच त्यांच्यासोबत काम करताना मजा आली. त्यांची विनोदबुद्धी अचाट आहे. त्यांच्या प्रोफेशनलिझमने मी भारावून गेलो. त्यांना आपले संवाद पाठ होते. त्या हसतमुख असायच्या आणि चैतन्याने भरभरुन होत्या. वय हे फक्त आकडे असतात, याचं पुष्पा जोशी हे जिवंत उदाहरण आहे' असं दिग्दर्शक राज कुमार गुप्ता यांनी सांगितलं.