Allu Arjun Pushpa 2 Stampede Case: अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 'पुष्पा 2' (Pushpa 2) चित्रपट थिएटरमध्ये येऊन दोन आठवडे झाले आहेत. मात्र या सिनेमाच्या प्रिमिअरवेळीच एक मोठा अपघात झाला. 4 डिसेंबर रोजी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा 8 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर आता त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, याच मुलाचं ब्रेन डॅमेज झाल्याचं सांगण्यात येत आहे.
अल्लू अर्जुन या मुलाची भेट घेण्यासाठी रुग्णालयात गेला होता. पण काही तांत्रिक कारणामुळे त्याला भेट घेता आली नाही. मात्र, दरम्यान हैदराबादचे पोलीस आयुक्त रुग्णालयात पोहोचले. जिथे त्यांनी श्री तेज यांच्या प्रकृतीचा आढावा घेतला. त्यावेळी तेलंगणाच्या आरोग्य सचिव क्रिस्टीना झेड. चोंगथू उपस्थित होते. या भेटीनंतर त्यांनी मुलाच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. हिंदू हिंदू वृत्तपत्रानुसार, पोलिस आयुक्त आनंद यांनी सांगितले की, मुलाच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्याचं ब्रेन डॅमेज झालं आहे. त्याची ही परिस्थिती सुधारण्यास वेळ लागेल असंही डॉक्टरांचं म्हणणं आहे.
पोलीस आयुक्तांनी घेतली मुलाची भेट
दरम्यान अल्लू अर्जुनने या मुलाची भेट का भेटला नाही असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यावर अल्लू अर्जुनने पोस्ट करत स्पष्टीकरणही दिलं होतं. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी त्या मुलाची भेट घेतली. तसेच त्याच्या प्रकृतीविषयी देखील माहिती दिली आहे. अल्लू अर्जुनने त्याविषयी पोस्ट लिहित म्हटलं होतं की, 'मी श्रीमान तेज यांच्या प्रकृतीबद्दल खूप काळजीत आहे. या घटनेनंतर तो रुग्णालयात असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. कायदेशीर प्रक्रियेमुळे मला यावेळी त्यांची भेट टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मी त्यांच्या कुटुंबासोबत आहे आणि त्यांच्यावर उपचार आणि मदत करण्यास कटिबद्ध आहे. त्याला लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे.
अपघातानंतर पोलिसांनी उचललं हे पाऊल
याप्रकरणी अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला गेल्या शुक्रवारी अटकही करण्यात आली होती. मात्र, त्याच दिवशी त्याला न्यायालयातून जामीन मिळाल्याने शनिवारी त्याची सुटका देखील करण्यात आली. 50,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर 4 आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला. एका मीडिया रिपोर्टनुसार, तेलंगणा पोलीस आता या अंतरिम जामिनाला आव्हान देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात.