Pu La Deshpande : पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात पु.ल. देशपांडे (Pu La Deshpande) यांची आज पुण्यतिथी आहे. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व, नाटककार, संगीतकार आणि आपल्या विनोदाने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारे सर्वांचे लाडके भाई म्हणजे पु. ल. देशपांडे होय. त्यांच्या अनेक कथा आजही अनेकांना तोंडपाठ आहे. विनोदी कथा सांगण्याच्या त्यांच्या विशिष्ट शैलीमुळे ते आजही चाहत्यांच्या स्मरणात आहे. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे दहा भन्नाट किस्से जाणून घ्या...
1. एकदा एक 'कदम' नावाचे गृहस्थ पु लंकडे मुलगा झाल्याचे पेढे घेऊन आले... त्यावेळी पु लंनी आशीर्वाद दिली की,"कदम कदम बढाये जा".
2. पु. ल. एकदा सुनिताबाईंची ओळख करुन देताना म्हणाले,"मी देशपांडे आणि या उपदेशपांडे".
3. पुलंचे पाय एकदा खूप सुजले होते. त्यावेळी आपल्या सुजलेल्या पायांकडे बघत ते म्हणाले,"आता मला कळलं की पायांना पाव का म्हणतात ते".
4. पुलंच्या 'सुंदर मी होणार' या नाटकावर आधारित असलेला 'आज और कल' हा हिंदी सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडला. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले,"हा सिनेमा नावाप्रमाणे दोनच दिवस चालला..."आज और कल".
5. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना काही कारणाने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते ऐकताच पु.ल म्हणाले,"त्यांच्या खोलीच्या दरवाज्यावर आता 'गर्वसे कहो हम हिंदुजा में है' असं लिहायला हरकत नाही".
6. साहित्य संघात एका रटाळ नाटकाच्या प्रयोगादरम्यान पु. ल. देशपांडे यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं होतं. त्यावेळी नाटकाच्या पहिल्या अंकादरम्यान पडद्यामागे काहीतरी पडल्याचा आवाज आला. त्यावेळी त्यांच्या शेजारी बसलेला एक प्रेक्षक म्हणाला,"काय पडलं हो?". त्यावेळी पु.ल. देशपांडे म्हणाले,"नाटक...दुसरं काय?".
7. पु.ल. देशपांडे एकदा प्रवासादरम्यान असताना त्यांना त्यांचा एक चाहता भेटला आणि त्यांना म्हणाला की,"माझी फक्त दोन व्यक्तींवर श्रद्धा आहे. एक ज्ञानेश्वर आणि दुसरे तुम्ही. माझ्या खोलीतही ज्ञानेवश्वरांच्याबाजूला तुमचाही फोटो लावला आहे. त्यावर पु.ल म्हणाले,"असं काही करू नका.. नाहीतर लोक विचारतील ज्ञानेश्वरांनी ज्यांच्याकडून वेद म्हणून घेतले तो रेडा हाच आहे का?".
8. पु. लं. देशपांडे एकदा मिठाई घेण्यासाठी चितळ्यांच्या दुकानात गेले. त्यावेळी ते म्हणाले की मिठाई खोक्यात बांधून द्या. दरम्यान दुकानदार म्हणाला की,"खोक्याचा चार्ज पडेल". त्यावर पुलं म्हणाले,"अरे वा...म्हणजे मिठाई फुकट?".
9. पुलं एकेठिकाणी त्यांच्या विनोदी शैलीत म्हणाले की,"मुलगी अगर मुलगा सरळ वळणाची अगर वळणाचा कसा असतो कोण जाणे.. कारण वळण म्हटल्यावर ते सरळ कसे असणार?".
10. पु.ल. देशपांडे यांच्या ओळखीच्या एका मुलीचं लग्न ठरलं होतं. त्या मुलीचं माहेरचं आणि सासरचं आडनाव एकच होतं. हे समजताच पु.लं म्हणाले,"बाकी काही म्हणा, पण मुलीने घराण्याचे नाव राखलं हो".
संबंधित बातम्या