मुंबई : बॉक्स ऑफिसवर पद्मावती आणि पॅडमॅन हे दोन्ही सिनेमे समोरासमोर उभं ठाकण्याची चिन्हं आहेत. प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधण्यासाठी या दोन्ही चित्रपटाच्या निर्मात्यांनी 25 जानेवारीला आपले सिनेमे प्रदर्शित करण्याच निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.

‘पॅडमॅन’ या चित्रपटासाठी आधीपासूनच 26 जानेवारी ही प्रदर्शनाची तारीख निश्चित करण्यात आली होती. तर ‘पद्मावती’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानं, त्याची तारीख निश्चित नव्हती. मात्र आता प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधून अधिक कमाई करण्याच्या उद्देशानं ‘पद्मावती’च्या निर्मात्यांनीही 25 तारखेलाच सिनेमा प्रदर्शित करण्याचं निश्चित केल्याचं वृत्त पीटीआय या वृत्त संस्थेनं दिलं आहे.

दरम्यान, संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावती' चित्रपटाला यू/ए प्रमाणपत्र देण्याची तयारी सेन्सॉर बोर्डाने दाखवली आहे. मात्र, सिनेमासंदर्भातील वाद संपण्याची चिन्हं दिसत नाहीत. पूर्व मेवाड राजघराण्यातील सदस्य विश्वराज सिंह यांनी सीबीएफसीच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. सेंसॉर बोर्ड अत्यंत बेजबाबदार असल्याचं सांगत त्यांनी ‘पद्मावती’बाबत परस्पर निर्णय घेतल्याचा आरोप विश्वराज सिंह यांनी केला आहे.

तर सिनेमाचं नाव बदलण्याच्या सूचना सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी काही दिवसांपूर्वीच दिल्या होत्या. सिनेमाची कथा काल्पनिक कवी ‘पद्मावत’ यांच्या कलाकृतीवर आधारीत असल्याचं दिग्दर्शकाने सांगितलं होतं. त्यामुळे भन्साळींना सिनेमाचं नावही ‘पद्मावत’ ठेवण्यास सांगितल्याचं सेंसॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी स्पष्ट केलं होतं.

दुसरीकडे अक्षय कुमारचा ‘पॅडमॅन’ बाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सूकता आहे. या सिनेमातून अक्षय कुमार सॅनिटरी पॅडबाबत जागरुकता करताना दिसणार आहे. येत्या 26 जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन आर बाल्की यांनी केलं आहे.

विशेष म्हणजे, ‘पॅडमॅन’ आणि ‘पद्मावती’सोबत आणखी एक सिनेमेही प्रदर्शित होत आहे. नीरज पांडे यांचा 'अय्यारी' आणि अक्षय कुमारचा 'पॅडमॅन' एकाच दिवशी रिलीज होतो आहे.