मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'टॉयलेट एक प्रेमकथा' वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या सिनेमाने कॉपीराईट कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप होत आहे. मानिनी या माहितीपटातून संवाद आणि सीन्स चोरल्याचा आरोप दिग्दर्शक प्रवीण व्यास यांनी केला आहे.

गेल्या वर्षी प्रवीण व्यास यांनी याच विषयावर 'मानिनी' हा माहितीपट तयार केला होता. या माहितीपटातले काही संवाद आणि सीन्स अक्षयच्या सिनेमात जसेच्या तसे उचलल्याचा आरोप व्यास  यांनी केला आहे.

सिनेमाच्या निर्मात्यांनी मात्र हे आरोप फेटाळले असून कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. सिनेमाची पटकथा 2013 मध्येच आमच्या लेखकांच्या नावे नोंदणीकृत आहे. जुलै 2015 पासून चित्रपटाचा विषय आणि त्याचे तपशील मीडियामुळे सर्वांसाठी खुले झाले होते. त्यामुळे हा आरोप तथ्यहीन असल्याचं टॉयलेट एक प्रेमकथाच्या सहनिर्मात्या प्रेरणा अरोरा यांनी म्हटलं आहे.

टॉयलेट एक प्रेमकथामध्ये अक्षयसोबत भूमी पेडणेकर असून सिनेमा 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
अक्षयकुमारच्या 'टॉयलेट- एक प्रेमकथा' या चित्रपटातून स्वच्छ भारत अभियानाला पाठिंबा देण्यात आला आहे. यातून प्रत्येक घरात शौचालय असण्याचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अक्षयचं कौतुक केलं होतं.

संबंधित बातम्या :


'टॉयलेट..'वरुन प्रेरणा, कोल्हापूरच्या तरुणांचं कौतुकास्पद पाऊल


अक्षय कुमारच्या सिनेमाचं नाव ऐकून मोदींनाही हसू अनावर!


'अक्षयच्या 'टॉयलेट'च्या दिग्दर्शकाची जीभ कापा, 1 कोटी मिळवा'