पुणे : बॉलिवूड अभिनेत्री तब्बूची भूमिका असलेल्या 'पियानो प्लेयर' चित्रपटाचं पुण्यातील शूटिंग बंद पाडण्यात आलं. स्थानिक रहिवाशांनी ट्राफिक जाम झाल्याची तक्रार केल्यामुळे नगरसेविकेच्या पतीने हे चित्रीकरण बंद पाडलं.


पुण्यातील खडकी कँन्टोन्मेंट परिसरात शुक्रवारी सकाळी 6.30 वाजल्यापासून 9.30 वाजेपर्यंत रस्ता बंद करुन चित्रपटाचं शूटिंग सुरु होतं. रस्ता अडवल्यानं परिसरात ट्रफिक जॅम झाला. याची तक्रार स्थानिकांनी नगरसेविका वैशाली पैहलवान यांच्याकडे केली.

त्यानंतर नगरसेविकेचा पती कैलाश पैहलवान यांनी घटनास्थळी जाऊन शुटिंगची परवानगी घेतली आहे का, असा सवाल विचारला. परंतु परवानगीचं कोणतंही परिपत्रक टीमला दाखवता न आल्याने शूटिंग आवरतं घेत युनिटने काढता पाय घेतला.

युनिटने वाहतूक पोलिसांकडून विना हरकत पत्र मिळवलं होतं. मात्र खडकी कँटोन्मेंट हा भाग संरक्षण विभागाच्या अखत्यारित येत असल्यामुळे केसीबी (खडकी कँटोन्मेंट बोर्ड)ची संमतीही आवश्यक होती. याविषयी कल्पना देऊनही चित्रपटाच्या टीमने ऐन गर्दीच्या वेळी रस्त्यावर शूटिंग करत वाहतूक रोखली.

हा प्रकार घडला त्यावेळी तब्बू उपस्थित असल्याची माहिती आहे. पियानो प्लेयर चित्रपटात तब्बूशिवाय आयुषमान खुराना आणि राधिका आपटे झळकणार आहेत.