8.56 लाख रुपये जमा करण्यास एक वर्षाचा विलंब केल्याप्रकरणी फिरोज नाडियादवालांना तीन महिन्यांचा कारावास सुनावण्यात आला आहे. 2009-10 या आर्थिक वर्षात कर भरण्यास नाडियादवालांनी दिरंगाई केली होती. निर्माते फिरोज नाडियादवाला यांनी वेलकम, वेलकम बॅक, फिर हेराफेरी, हेराफेरी 3, दिवाने हुए पागल, आवारा पागल दिवाना, आन यासारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.
'उशिराने रक्कम भरल्याने गुन्हेगारी दायित्व कमी होत नाही, असं बॅलार्ड पियर मॅजिस्ट्रेट कोर्टाने निक्षून सांगितलं. 'आर्थिक विवंचना आणि 2009-10 या वर्षात व्यवसाय कमी झाल्यामुळे कर भरण्यास उशीर झाल्याचं नाडियादवालांनी सांगितलं होतं. 'त्यानंतरच्या तीन वर्षांत चित्रपट निर्मिती केली नाही, मात्र जुन्या चित्रपटांच्या विक्रीमुळे आपलं उत्पन्न स्थिर राहिलं. परंतु टीडीएस भरण्यास उशीर झाला', हा नाडियादवाला यांनी केलेला दावा कोर्टाने फेटाळून लावला.
मार्च 2014 मध्ये एका आयकर अधिकाऱ्याने फिरोज नाडियादवालांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. निर्धारित वेळेत कर न भरल्याचं योग्य कारण नाडियादवाला देऊ शकले नसल्याचा आरोप करण्यात आला होता.