दिसपूर : अभिनेत्री प्रियंका चोप्राचा फ्रॉकमधील फोटो आसाम टूरिझमच्या कॅलेंडरवर छापल्यामुळे वातावरण तापलं आहे. आसाम पर्यटनाच्या ब्रँड अॅम्बेसेडरपदावरुन प्रियंकाची हकालपट्टी करण्याची मागणी झाल्यानंतर आसामचे पर्यटन मंत्री तिच्या बचावासाठी पुढे सरसावले.


आसाम पर्यटनाची सदिच्छादूत असलेल्या प्रियंका चोप्राची पदावरुन हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या आमदारांनी केली. मात्र विरोधक या प्रकरणातून प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत, असं सांगत आसामचे पर्यटन मंत्री हिंमत बिस्वा सर्मा यांनी प्रियंकाची पाठराखण केली.

आसाम पर्यटन विकास महामंडळ (एटीडीसी) च्या कॅलेंडरवर प्रियंका चोप्राचा फ्रॉकमधील फोटो छापल्याने काँग्रेस आमदार नंदिता दास, रुपज्योती कुर्मी यांचा तिळपापड झाला. त्यामुळे आसाम पर्यटनाची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून तिची नियुक्ती रद्द करण्याची मागणी काँग्रेसने उचलून धरली.

'सरकारने आसामी समाजाचा आदर करावा. फ्रॉक हा आसामचा पारंपरिक पोशाख नाही. कॅलेंडरवरील फोटो अजिबात सौम्य नाही. आसामी समाजाचा मान कसा राखावा, हे सरकारला समजायला हवं. पारंपरिक मेखेला सेदोरही वापरता आला असता.' असं काँग्रेस नेत्यांनी म्हटलं.