Priyanka Chopra: बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रानं (Priyanka Chopra) बॉलिवूडबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीत देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. प्रियांका आणि तिचा पती निक जोनास यांनी 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या भव्य उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली. दोन दिवस आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या प्रियांकानं तिच्या ग्लॅमरस लूकने अनेकांचे लक्ष वेधले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी प्रियांकानं विंटेज ड्रेस परिधान केला होता. हा ड्रेस 65 वर्षांपूर्वीच्या साडीपासून तयार करण्यात आला आहे. प्रियांकानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या ड्रेसच्या खास गोष्टींबाबत सांगितलं. या पोस्टच्या माध्यमातून तिनं ड्रेस डिझायनरचे देखील आभार मानले.
'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या उद्घाटन सोहळ्यामध्ये प्रियांकाने डिझायनर अमित अग्रवालनं डिझाइन केलेला ड्रेस परिधान केला होता. तिनं सोशल मीडियावर कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी परिधान केलेल्या ड्रेसचे अनेक फोटो शेअर करत तिच्या ड्रेसच्य काही खास गोष्टी सांगितल्या.
प्रियांकाची पोस्ट
प्रियांकानं तिच्या ड्रेसचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन पोस्टमध्ये लिहिलं, 'हा सुंदर ड्रेस 65 वर्ष जुन्या विंटेज बनारसी पटोला (ब्रोकेड) साडीपासून बनवण्यात आला आहे. यात चांदीचे धागे आणि खादी सिल्कवर सोन्याचे इलेक्ट्रोप्लेटिंगचा वापर करण्यात आला आहे. ब्रोकेडमध्ये सेट केलेले इकट विणकामाचे नऊ रंग प्रतिबिंबित करण्यासाठी ते सिक्वीन्स शीट होलोग्राफिक बस्टियरसह जोडलेले आहे. अमित आणि त्याच्या टीमचे धन्यवाद. हा ड्रेस अमित आणि त्याच्या टीमनं सहा महिन्यांमध्ये तयार केला आहे.'
पाहा फोटो
प्रियांकाच्या विंटेज आणि मॉडर्न टच असलेल्या ड्रेसचं तिच्या चाहत्यांनी कौतुक केलं आहे. अनेकांनी प्रियांकानं शेअर केलेल्या ड्रेसच्या फोटोला लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.
प्रियांका लवकरच सिटाडेल या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ही सीरिज जगभरातील 240 हून अधिक देशांमध्ये स्ट्रीम केली जाणार आहे. 'सिटाडेल' या वेब सीरिजची निर्मिती 236 मिलियन डॉलरमध्ये करण्यात आली आहे, असं म्हटलं जात आहे. ही सीरिज भारतातील लोक हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये पाहू शकणार आहेत. प्रियांकाच्या या सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: