मुंबई : भारत आणि पाकिस्तानमधल्या संबंधांवरुन प्रत्येक वेळी फक्त फिल्मस्टार्सनाच टार्गेट का केलं जातं, असा सवाल अभिनेत्री प्रियंका चोप्राने उपस्थित केला आहे. 'एनडीटीव्ही' या वृत्तवाहिनीशी बोलताना प्रियंका चोप्राने हे मत व्यक्त केलं.


देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपलं सरकार जी भूमिका घेतं, त्याचा आदर मी करते, पण जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तानदरम्यान तणाव निर्माण होतो, तेव्हा फक्त कलाकारांनाच का लक्ष्य केलं जातं? असा सवालही तिने उपस्थित केला. दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या विधानाला प्रियंकाने एकप्रकारे पाठिंबाच दिला आहे.

प्रियंका चोप्राचे वडील दिवंगत अशोक चोप्रा हे देखिल एक लष्करी अधिकारी होते. पण असं असलं, तरी या परिस्थितीला फक्त कलाकारांना जबाबदार धरता येणार नाही, असं ठाम मत प्रियंकाचं आहे. दोन्ही देशांमध्ये वितुष्ट आलं, की कोणत्याही उद्योजक, राजकारणी किंवा डॉक्टरांना नाही, तर कलाकारांनाच का जबाबदार धरलं जातं, असा सवालही प्रियंकानं विचारला आहे.

उरी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचं समर्थनही प्रियंकाने केलं. पण पाकिस्तानी कलाकारांना बंदी घालून, काहीच साध्य होणार नाही, असंही प्रियंका म्हणाली. आतापर्यंत पाकिस्तानमधल्या कोणत्याही कलाकारामुळे भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण झालेला नाही, त्यामुळे या घटनेसाठी त्या कलाकारांना जबाबदार धरून प्रश्न सुटणार नाहीत, असंही मत प्रियंकाने मांडलं.

मोदीजी, पाकिस्तान दौऱ्याबाबत माफी कधी मागताय? : अनुराग कश्यप


करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल मुश्किल’चं समर्थन करत बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच निशाणा साधला आहे. पाकिस्तानला भेट देणाऱ्या पंतप्रधान मोदींनी देशवासीयांची माफी मागावी, असे ट्वीट अनुरागने आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरुन केलं आहे.

ऐ दिल है मुश्किलचा वाद काय आहे?

‘ऐ दिल है मुश्किल’ या करण जोहरच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याची भूमिका आहे. पाकिस्तानी कलाकारांना आपल्या सिनेमात घेऊ नये, यासाठी मनसेने आवाज उठवला होता. त्यानंतर फवाद खान आणि इतर पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडलं. मात्र, करण जोहरच्या सिनेमात फवादची भूमिका असल्याने तो वादात सापडला. आता तर सिंगल स्क्रिन थिएटर असोसिएशन आणि सिनेमा ओनर असोसिएशनने करण जोहरचा सिनेमा थिएटरमध्ये न प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 28 ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमासमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत.