मैथिली जावकरकडून महिला आयोगातील पांडेंविरोधी केस मागे
एबीपी माझा वेब टीम | 17 Oct 2016 07:51 AM (IST)
मुंबई : अभिनेत्री मैथिली जावकर यांनी भाजपचे पदाधिकारी गणेश पांडेंविरोधात राज्य महिला आयोगात दाखल केलेली केस मागे घेतली आहे. महिला आयोगामध्ये सुरु असलेल्या केसमधून मैथिली यांनी माघार घेतली असली, तरी एफआयआर मागे घेतलेला नाही. महिला आयोगासमोर हजर राहण्यात शूटींग आणि शोजचं नुकसान होत असल्याचं कारण पुढे करत मैथिली जामकर यांनी केस मागे घेतली आहे. भाजयुमोचे अध्यक्ष गणेश पांडे यांनी अश्लील भाषेचा वापर करत आपला विनयभंग केल्याची तक्रार मैथिली जावकर यांनी केली होती. मथुरा येथे घेण्यात आलेल्या भाजयुमोच्या एका परिषदेच्यावेळी ही घटना घडल्याचा दावा जावकर यांनी केला. मात्र पक्षाने योग्य ती कारवाई केली आहे, असं जावकर यांनी पत्रात नमूद करत या संपूर्ण प्रकारातून अंग काढून घेतलं आहे. 4 मार्च रोजी मथुरेतील कार्यक्रमात पांडेंनी विनयभंग केल्याचा दावा जावकर यांनी केला होता. काय आहे प्रकरण ? गणेश पांडे भाजयुमोच्या मुंबई शहराध्यक्षाने मथुरेत झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान आपला विनयभंग केल्याचा आरोप जावकरांनी केला होता. भाजयुमोच्या एका परिषदेनिमित्त देशभरातले कार्यकर्ते मथुरेतल्या एका हॉटेलात उतरले होते. तेव्हा ही घटना घडल्याचं त्यांनी सांगितलं. 4 मार्चच्या रात्री पांडेनं वारंवार फोन करुन, मेसेज करुन मला आपल्या रुमवर बोलावलं आणि तिथे गेल्यावर अश्लील वर्तन केलं, असा आरोप तिने केला आहे. इतकंच नव्हे तर मी तिथून निघाले असता त्याने हात पकडण्याचाही प्रयत्न केल्याचं तिने म्हटलं आहे.