मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या लग्नांचा मौसम सुरु आहे. सोनम कपूर आणि नेहा धुपिया या दोघींनी यंदा त्यांची लग्नं उरकून घेतली. त्यांच्या पठोपाठ नुकतेच दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंग विवाहबंधनात अडकले. आता प्रियांका चोप्रा आणि गायक निक जोनासच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. 30 नोव्हेंबर रोजी प्रियांका आणि निकचे राजस्थानमधील जोधपूरमध्ये लग्न होणार आहे.


प्रियांका शाही पद्धतीने विवाह करणार असल्याने तिच्या लग्नाला कोण कोण उपस्थित राहणार याबाबत सर्वांच्याच मनात उत्सुकता आहे. प्रियांका आणि निक दोघेही दिल्लीमध्ये असताना या जोडप्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी मोदींना त्यांच्या लग्नाचे निमंत्रण दिले असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. मोदी सतत त्यांच्या कामांसह निवडणुकांमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे ते या लग्नाला उपस्थित राहतील की नाही हा प्रश्न आहे.

प्रियांका याआधी मोदींना अनेकदा भेटली आहे. मोदींच्या परदेशातील एका दौऱ्यावेळीदेखील प्रियांकाने मोदींची भेट घेतली होती. त्यानंतरही या दोघांचे चांगले संबंध समोर आले होते. त्यामुळे मोदी या लग्नाला उपस्थित राहिले तर आश्चर्य वाटायला नको.

कुठे आहे प्रियांकाचे लग्न?

प्रियांका आणि निक गेल्या दीड वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. काही महिन्यांपूर्वी दोघांचा मुंबईत साखरपुडा पार पडला. 30 नोव्हेंबर रोजी राजस्थानमधील जोधपूर येथील उमेद भवन या राजवाड्यात प्रियांका आणि निकचा विवाह होणार आहे. काही महिन्यांपूर्वी प्रियांका आणि निक राजस्थानला फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी उमेद भवन हा महाल पाहिला. तेव्हाच प्रियांकाने इथे लग्न करण्याचे ठरवले होते.