Pravin Tarde : पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या प्रचारासाठी महायुतीची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी या सभेला हजेरी लावली आहे. या सभेत प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांनी केलेलं भाषण चांगलच गाजलं. दरम्यान कोणीतरी पुण्याचा रंग बदलण्याचा प्रयत्न करतंय असा दावा प्रवीण तरडे यांनी केला. मुळशीचा सुपुत्र म्हणून आवाहन करतो खंबीर नेतृत्व पुण्याला द्या, असं आवाहन त्यांनी पुण्याच्या नागरिकांना केलं. परिस्थिती बिकट, हिंदू तेवढाच तिखट. मैत्रीचा पॅटर्न असाच चालू राहील. सालस, सज्जन, सुशिक्षित नेतृत्व आपल्याला हवं, असं प्रवीण तरडे म्हणाले.
परिस्थिती जेवढी बिकट, हिंदू तेवढाच तिखट : प्रवीण तरडे
प्रवीण तरडे म्हणाले,"नेमकी ही धडधड माझ्याच वाट्याला आली. ज्यांच्या वाणीवर सरस्वतीचं वरदान आहे त्यांच्यासमोर आज बोलावं लागतंय. मी माझ्या मित्रासाठी इथे आलो आहे. मुरलीधर मोहोळ माझा मित्र आहे. आणि एवढचं सांगेल दोस्तीचा हा पॅटर्न आम्हाला सर्वदूर पोहोचवायचा आहे. सालस, सज्जन आणि सुशिक्षित नेतृत्व आपल्याला मिळतंय. माझ्या चित्रपटातला एक डायलॉग घेऊन मी एवढच म्हणेल,दोन-दोन वर्षे पाऊस नाही पडला स्वराज्यात तरी थंडीच्या तवावर ज्वारी-बाजरी काढणारी जात आहे आपली...परिस्थिती जेवढी बिकट, हिंदू तेवढाच तिखट.. हा डायलॉग बोलायची या व्यासपीठावर गरज पडली. कारण कोणीतरी पुण्याचा रंग बदलण्याचा प्रयत्न करतोय. पण पुण्याचा रंग इतक्या सहजासहजी बदलू शकत नाही. इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या बापज्यादाने स्वराज्यासाठी या पुण्यात रक्त सांडलेलं आहे.
प्रवीण तरडे पुढे म्हणाले,"माझा धर्मवीर चित्रपट ज्यावेळी आला आणि त्यातला एक राजसाहेबांचा सीन सिनेमात असलेला कट झाला. अनेक मनसैनिक माझ्यावर नाराज झाले. पण साहेबांना त्याचं कारण माहिती आहे. शिंदे साहेबांनी अनेक भाषणात ते सांगितलं आहे. राज साहेब आमचे आदर्श आहेत. कलाकारांच्या पाठिशी एखाद्या पक्षाने किती ठामपणे उभं राहावं हे या शहरातल्या प्रत्येक कलाकाराने अनुभवलं आहे. त्यामुळे मुरलीधर मोहोळचा मित्र, मुळशीचा सूपुत्र म्हणून मी तुम्हाला एवढचं आवाहन करतो की पुढचे काही वर्षे आपल्याला खंबीर नेतृत्व देईल असं नेतृत्व भारतीय जनता पार्टीने पुणे शहराला दिलं आहे. मुळशी तालुक्याचं एक वैशिष्ट्य आहे की सुरतेची लूट शिवाजी महाराजांनी मुळशीतून रायगडमार्गे नेली आणि त्यांच्या पत्रात उल्लेख आहे. अत्यंत प्रामाणिक आणि इमानदार माणसं या भागात राहतात. त्यामुळे ही लूट प्रामाणिकपणे रायगडावर पोहोचेल. तो मुळशीतला प्रामाणिक मावळा आज मोदी साहेबांनी दिल्लीला पाठवण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे हात जोडून विनंती की मुळशी तालुक्याचा हा प्रामाणिकपणा आपल्याला सर्वदूर न्यायचा आहे".
संबंधित बातम्या