Prashant Damle : मराठी रंगभूमीवरील ‘बुकिंगचा सम्राट’ अर्थात प्रशांत दामले (Prashant Damle) लवकरच 12,500 प्रयोगांचा टप्पा पार करणार आहेत. दामलेंचा रंगभूमीवरील प्रवास बेस्टमधून सुरू झाला आहे. त्यानिमित्ताने एबीपी माझाच्या '12 हजार 500 प्रयोगांचा बेस्ट प्रवास' या कार्यक्रमाच्या माध्यमातून दामलेंनी बेस्टच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 


'बेस्ट'च्या नोकरीत दामले कोणतं काम करायचे?


बेस्टच्या आठवणींना उजाळा देत दामले म्हणाले,"बेस्टमध्ये काम करत असताना मी दररोज बेस्टने प्रवास करायचो. या प्रवासादरम्यान खूप मजा करायचो. नाटकासाठी बेस्टचा खूप सपोर्ट होता. बेस्टमध्ये असताना मी टायपिंग सेक्शनमध्ये काम करत असे. त्यावेळी सात तासात ठराविक शब्दसंख्या गाठावी लागत असे. पण माझा स्पीड चांगला असल्याने पहिल्या तीन तासांत माझं काम पूर्ण होत असे. त्यामुळे मला नाटक, मजा आणि काम अशा तिन्ही गोष्टी बेस्टमध्ये असताना करायला मिळाल्या. 


प्रशांत दामलेंची नाटकात एन्ट्री कशी झाली?


प्रशांत दामले कॉलेजमध्ये असताना नाटकात काम करत असे. पुढे बेस्टमधून त्यांनी राज्य-स्तरावर तीन ते चार नाटकांत काम केलं. या नाटकांत ते अभिनय करत नसून गाणी म्हणायचे. पण नंतर गेल्या तीन दशकांत ते मोरू, माधव, मन्या, केशव, डॉ. पुंडलिक, बहरूपी, राजा, फाल्गुनराव अशा अनेक भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले. 


'टूरटूर'ने दिला ब्रेक!


प्रशांत दामलेंनी 1983 साली 'टूरटूर' या नाटकाच्या माध्यमातून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं. त्यानंतर 'लोकधारा', 'मोरूची मावशी', 'ब्रह्मचारी', 'पाहुणा' अशा वेगवेगळ्या नाटकांत वेगवेगळ्या भूमिका त्यांनी साकारल्या आणि त्यांच्या रंगभूमीवरील प्रवासाची बस सुसाट सुटली. 


'पाहुणा' या नाटकात प्रशांत दामलेंना एक वेगळी भूमिका करायला मिळाली. त्यावेळी त्यांच्या 'मोरूची मावशी' या नाटकाने एक हजार प्रयोगांचा टप्पा पार केला. त्यानंतर 'गेला माधव कुणीकडे' या नाटकाने 1800 प्रयोग, 'एका लग्नाची  गोष्ट'ने 1800 प्रयोग तर 'चार दिवस प्रेमाचे' या नाटकाचे 1200 प्रयोग झाले. यासंदर्भात भाष्य करताना प्रशांत दामले म्हणाले,"चांगली नाटकं, संहिता, निर्माते, सहकलाकार आणि दिग्दर्शक मिळाल्याने असे प्रयोग होत गेले". 


प्रदीप पटवर्धनच्या आठवणींत रमले प्रशांत दामले...


प्रशांत दामले म्हणाले,"प्रदीप पटवर्धन माझा जीवलग मित्र होता. एकदम बिनधास्त असं त्याचं व्यक्तिमत्त्व होतं. आयुष्यात त्याला फार कमी प्रश्न पडायचे. त्याचं आकलन उत्तम होतं. वाणी शुद्ध होती. आणि नृत्याचं अंग अप्रतिम होतं. त्यामुळे सर्व आघाड्यांवर प्रदीप पटवर्धन उत्तम होता". 


करिअरच्या या टप्प्यावर प्रशांत दामलेंना कोणाची आठवण येते?


प्रशांत दामले आज रंगभूमीवरील बादशाह आहेत. पण या टप्प्यावर त्यांना मंगेश कांबळी, विजय चव्हाण, प्रदीप पटवर्धन, रत्नाकर मतकरी, सुधीर भट्ट, मोहन वाघ यांची आठवण येते. यासंदर्भात बोलताना दामले म्हणाले,"ही मंडळी आज आपल्यात नसली तरी ती आहेत. माझ्या प्रवासावर ते लक्ष ठेऊन आहेत". 


प्रशांत दामले करणार दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण!


अभिनेता, गायक, निवेदक, निर्माते अशी प्रशांत दामलेंची ओळख आहे. पण लवकरच ते आता दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. दिग्दर्शक होण्याबद्दल दामले म्हणाले,"दिग्दर्शक होण्याचा विचार आहे. पण त्या गोष्टीला वेळ आहे. दिग्दर्शक झालो तर नाटकाचाच दिग्दर्शक होईल". 


प्रशांत दामलेंच्या सुखाची व्याख्या -


'दिवसभराचा त्रास डोक्यात ठेऊन झोपू नये' ही प्रशांत दामलेंची सुखाची व्याख्या आहे.


संबंधित बातम्या


Prashant Damle : मराठी रंगभूमीवरील ‘बुकिंगचा सम्राट’ प्रशांत दामलेंचा विक्रमी प्रयोग; 'एका लग्नाची पुढची गोष्ट' पाहा विनामुल्य