Prajakt Deshmukh : प्राजक्त देशमुख (Prajakt Deshmukh) हे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. लेखक-दिग्दर्शक प्राजक्त एक उत्कृष्ट अभिनेतादेखील आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे. आता लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता असणाऱ्या प्राजक्त देखमुखला एकाच दिवशी, एकाच ठिकाणी तिहेरी भूमिकेत प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 


प्राजक्तच्या 'जाळियेली लंका' (Jaliyeli Lanka) आणि 'तो राजहंस एक' (To Rajhans Ek) या दोन कलाकृती प्रेक्षकांना एकाच मंचावर पाहता येणार आहेत. 'जाळियेली लंका' या दीर्घांकाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा प्राजक्तने सांभाळली आहे. तसेच 'तो राजहंस एक' या प्रायोगिक नाटकात तो अभिनेत्री अनिता दातेसोबत अभिनय करताना दिसणार आहे. 






'जाळियेली लंका' या दीर्घांकासंदर्भात प्राजक्त देशमुख म्हणाला, "एखादी गोष्ट अमूक एका कारणासाठी जन्माला येते. पण नंतर ती गोष्ट तेवढं सोडून बाकी सगळं करते. संभाषणात अडथळा येणं हा 'जाळियेली लंका' या दीर्घांकाचा महत्त्वाचा भाग आहे. समाजातलं व्यंग प्रहसन या माध्यमातून सांगितलं तर ते व्यवस्थित कळतं. 


'जाळियेली लंका' या नाटकाचं कथानक काय? (STORY OF JALIYElI LANKA) 


रामलीलाचं नाटक संपलं असून, प्रेक्षक आणि कलावंत आपापल्या घरी गेले आहेत. परंतु मारुतीचं काम करणारा कलावंत तिथेच बसला आहे. त्याचं म्हणणं आहे, मगाशी नाटकात मारुतीची शेपटी जाळली ती नाटक संपलं तरी विझलेलीच नाही. तिच्याकडे कुणीही लक्ष दिलेलं नाही. हा छोटा मुद्दा कसा वाढत जातो. त्याचा राईचा पर्वत कसा होतो. यात आजूबाजूची लोकं, व्यवस्था कशी कारणीभूत ठरते या व्यवस्थेवर बेतलेला एक सांगीतिक प्रहसनात्मक ताशेरा म्हणजे 'जाळियेली लंका' होय. 


'जाळियेली लंका' हे नाटक करण्याबद्दल प्राजक्त म्हणाला, "प्रोयोगिक रंगभूमीवर मुलांसाठी सतत नवीन काहीतरी केलं पाहिजे. या एका जबाबदारीच्या भावनेतून मी हे नाटक केलं आहे. आतापर्यंत झालेल्या सर्वच प्रयोगांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे." 


ज्वलंत विषय मांडणारं 'तो राजहंस एक' (To Rajhans Ek) 


'तो राजहंस एक' या नाटकाबद्दल प्राजक्त म्हणाला, "तो राजहंस एक' हे नाटक मानसिक आरोग्य किती महत्त्वाचं आहे हे सांगणारं आहे. एका शेतकरी मुलाला लग्न करायचं आहे. पण, मुलींना गावी राहणारा, शेती करणारा मुलगा नको आहे. त्यांना शहरात जॉब करणारा मुलगा हवा आहे. पण, या परिस्थितीचा त्या दोघांच्या मनावर काय परिणाम होतो, अशा दोन्ही बाजूने एक ज्वलंत विषय मांडणारं हे नाटक आहे. खेड्यातल्या नैराश्यावर भाष्य करणारं हे नाटक आहे.


संबंधित बातम्या


Prajakt Deshmukh : नाशिक-मुंबई महामार्ग नसून छळमार्ग, 'वाट दिसु दे गा'; असं म्हणत लेखक प्राजक्त देशमुख यांनी व्यक्त केला संताप