Parag Bedekar : अभिनेते पराग बेडेकर (Parag Bedekar) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 47 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांनी मराठी मालिका आणि नाटकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. आता त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांना मोठा धक्का बसला आहे.
पराग (Parag Bedekar Passes Away) यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी आहे. ठाणे (Thane) शहराला सांस्कृतिक क्षेत्रात नाव लौकिक मिळवून देण्यात पराग बेडेकर यांचा मोलाचा वाटा होता. कॉलेजमध्ये असताना एकांकिकांच्या माध्यमातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. यदा कदाचित, मी नथुराम गोडसे बोलतोय, पोपटपंची, सारे प्रवासी घडीचे, लाली लीला अशा अनेक नाटकांत पराग महत्त्वाच्या भूमिकेत होते.
पराग यांनी नाटकांसह 'कुंकू', 'चारचौघी', 'एक झुंझ वादळाशी', 'ओढ लावावी जिवा' अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्येदेखील काम केलं आहे. अभिनयासह त्यांनी दिग्दर्शनाची धुरादेखील सांभाळली आहे. आता त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
लेखक चंद्रशेखर गोखले यांनी दु:ख व्यक्त करत लिहिलं आहे,पराग गेला? उत्कृष्ट अभिनेता, खूप सहज अभिनय करायचा, त्याच्या स्वत:च्या काही खास लकबी होत्या. बोलता बोलता नाक चोळण्याची त्याची खास स्टाईल होती. मी त्यावरुन छेडलं की छान हसायचा...हास्य तर लाजवाब होतं त्याचं... कुठे गेला कुठे गेला बा शोध अचानक थांबला".
अभिनेता सागर खेडेकरने परागच्या निधनावर शोक व्यक्त करत लिहिलं आहे,"अरे आपल्याला पुन्हा एकदा एकत्र नाटक करायचं होतं ना? मग? यदा कदाचित, लाली लीला या दोन नाटकांवरच मैत्री सोडून एवढ्या लांब गेलास? गेलास तो गेलास पुन्हा कधीच भेट होऊच शकत नाही या जन्मात एवढ्या लांब? असो बरं वाटत असेल तुला कदाचित... पण यार आम्हाला दु:खी करून गेलास...मिस करीन तुला यार..जिथे कुठे असशील सुखी राहा मित्रा...पऱ्या तुझ्या आत्म्यास शांती मिळो".
आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये पराग बेडेकर यांनी अभिनेता व दिग्दर्शक म्हणून मोलाची कामगिरी बजावली आहे. मृगजळ, उन्मेष, अशा अनेक स्पर्धांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या बळावर पराग बेडेकर यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पुरस्कार पटकावले आहेत.
संबंधित बातम्या