प्रत्युषाचा मृत्यू गळफासामुळेच, शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट
एबीपी माझा वेब टीम | 03 Apr 2016 02:45 AM (IST)
मुंबई : अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूप्रकरणी शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला आहे. ऑक्सिजनचा कमी पुरवठा झाल्यामुळं प्रत्युषाचा गुदमरून मृत्यू झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. प्रत्युषाच्या गळ्यावर फास लागल्याच्या खुणा असल्याचंही अहवालात म्हटलं आहे. त्यामुळं प्रत्युषाचा मृत्यू गळफासामुळंच झाल्याचं अहवालानुसार स्पष्ट होतं आहे. प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्येप्रकरणी तिचा प्रियकर राहुलला पोलिसांनी चौकशी करुन सोडून दिलं आहे. प्रत्युषाच्या आत्महत्येपूर्वी दोघांमध्ये वाद झाला नसून आदल्या रात्री दोघांनीही आपल्या एका मित्रासह पार्टी केल्याचं मुंबई पोलिसांनी म्हंटलं आहे. या पार्टीत रात्रभर दारू प्यायल्याची माहिती मिळते आहे. सकाळी राहुल आपल्या मित्राला सोडायला गेला तेव्हा ही प्रत्युषा मद्यप्राशन करत होती, असं पोलिसांनी माहितीत म्हंटलं आहे. प्रत्युषा दुपारीही मद्यप्राशन करत होती आणि त्यानंतर राहुल तासाभरासाठी जेवण आणण्यासाठी बाहेर गेला आणि यादरम्यान प्रत्युषानं आत्महत्या केल्याचं राहुलनं म्हंटलं. काल प्रत्युषाच्या पार्थिवावर ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. आई-वडिलांकडून राहुलवर आरोप नाहीत दरम्यान, राहुल राजच्या जबानीवर पोलिसांना विश्वास नसून तासाभरासाठी राहुल कुणाला तरी भेटला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. प्रत्युषाच्या आई-वडिलांच्या जबानीत त्यांनी राहुलवर कोणतेही आरोप केलेले नाहीत. प्रत्युषाची हत्या, निकटवर्तीयांना संशय याप्रकरणातलं कोणतंही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळालेलं नाही. शिवाय प्रत्युषाची आर्थिकदृष्ट्या अडचणीत होती याचीही माहिती मिळाली नसल्याचं पोलिसांनी म्हंटलं आहे. तर प्रत्युषानं आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा संशय तिच्या निकटवर्तीयांनी वर्तवला आहे.