मुंबई : 90 च्या दशकातील सुप्रसिद्ध पॉप गायक आणि 2006 मधील 'बिग बॉस'चा स्पर्धक बाबा सहगल याचे वडील जसपालसिंह सहगल यांचं सोमवारी रात्री कोरोनामुळे निधन झालं आहे. ते 87 वर्षांचे होते. बाबा सहगलने सोशल मीडिया पोस्टद्वारे वडिलांच्या निधनाची माहिती सर्वांना दिली. त्यानंतर अधिक माहितीसाठी एबीपी न्यूजने बाबा सहगलशी संपर्क साधला. त्यावेळी कळालं की वेळेत उपचार न मिळाल्याने जसपालसिंग यांचा मृत्यू झाला.
सध्या हैदराबादमध्ये असलेले बाबा सहगल यांनी एबीपी न्यूजला फोनवर सांगितले की, माझे वडील माझी बहिण आणि तिच्या पतीसोबत लखनौच्या गोमतीनगर महानगरामध्ये राहत होते. काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ते बरे होत होते. मात्र सायंकाळी उशीरा अचानक त्यांची बिघडली. त्यांची ऑक्सिजनची पातळी कमी झाली होती.
कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर वडील गेले 8 दिवस घरी क्वॉरंटाईन होते. पण सोमवारी रात्री अचानक त्यांची ऑक्सिजनची पातळी कमी झाली. त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळत नव्हती. त्यानंतर एक रुग्णवाहिका मिळाली. मात्र रुग्णालयात नेले तेव्हा तेथे ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध नव्हते आणि नवीन रूग्णांसाठी बेडचीही सोय नव्हती. जर सर्व गोष्टी वेळेत मिळाल्या असत्या तर वडिलांचा मृत्यू झाला नसता, असं बाबा सहगल यांनी म्हटलं.
बाबा सहगलने पुढे म्हटलं की, वडील गेल्याचं दु:ख नाही. कारण ते त्यांचं आयुष्य जगले होते. माझे वडील लढाऊ होते. सद्य परिस्थिती पाहता वडिलांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी बाबा सहगल लखनौलाही जाऊ शकला नाही. आज सकाळी वडिलांचा अंत्यसंस्कार करण्यात आले.