मुंबई : पोलिश मॉडेल आणि अभिनेत्री अँजेला क्रिस्लिन्झकीने बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशनचे आभार व्यक्त केल्यानंतर चर्चा रंगायला सुरुवात झाली. साहजिकच आपले आभार मानणारी ही तरुणी कोण हा प्रश्न हृतिकला पडला, किंवा त्याने तसं भासवलं. मात्र हृतिकच्या ट्वीटवर सपशेल माफी मागून अँजेला मोकळी झाली आहे.
'हृतिक हा माझा मित्र आणि मार्गदर्शक (मेंटर) आहे' अशा मथळ्याखाली अँजेलाची मुलाखत 'डीएनए' सारख्या काही वृत्तपत्रांमध्ये छापून आली. हृतिकसोबत आपण एका जाहिरातीत काम केलं असून त्याच्याशी असलेलं बाँडिंग आणि त्याने दिलेली प्रेरणा, याबाबत तिचे अनुभव या मुलाखतीत मांडले आहेत.
मात्र ही मुलाखत आणि त्या अनुषंगाने रंगलेल्या चर्चा ऐकून हृतिक बुचकळ्यात पडला. या बातमीचा फोटो काढत हृतिकने 'माय डियर लेडी, कोण आहेस तू? आणि का खोटं बोलत आहेस?' असा प्रश्न ट्विटरवर विचारला.
https://twitter.com/iHrithik/status/849131238795481088
हृतिकच्या ट्वीटला उत्तर देत अँजेलाने तात्काळ माफीनामा मागितला. दिशाभूल करणाऱ्या हेडलाईन्स आणि सगळ्या गोंधळासाठी सॉरी, असं अँजेला म्हणते.
'हृतिक सर, मला तुमच्याविषयी प्रचंड आदर आहे. दिशाभूल करणाऱ्या हेडलाईन्ससाठी मला माफ करा. हे खूप वेदनादायी आहे. इतर लाखो चाहत्यांप्रमाणे मला तुम्ही अभिनेता म्हणून प्रचंड आवडता. सुदैवाने मला तर तुमच्यासोबत दोन जाहिरातींमध्ये काम करण्याची संधीही मिळाली.' असं अँजेलाने ट्विटरवर लिहिलं आहे.
'माझ्या मते, मेंटर म्हणजे मला आयुष्यात योग्य दिशा दाखवणारी, प्रेरणा देणारी व्यक्ती. एका चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत मला प्रश्न विचारला गेला. फॉरेन लूक्स असूनही बॉलिवूडमध्ये पदार्पणाचा विचार कसा काय आला, या प्रश्नावर मी तुमचं नाव घेतलं. हृतिक रोशनसोबत शूटिंग करताना त्यांच्या प्रेरणादायी शब्दांमुळे मी चित्रपटात आले.' असं अँजेलाने स्पष्ट केलं.
'संबंधित लेखामध्ये इतर लाखो लोकांप्रमाणे तुम्ही माझ्यासाठी कसे प्रेरणादायी ठरलात, त्यावरच भाष्य करण्यात आलं आहे. मात्र तुम्हाला जर कुठलाही त्रास किंवा मनस्ताप झाला असेल, तर मी क्षमा मागते.' असं अँजेलाने म्हटलं आहे.
https://twitter.com/angelakrislinzk/status/849193976037085185
हृतिकनेही अँजेलाच्या माफीनाम्याला विनम्रतेनं उत्तर दिलं आहे. 'खरंच, किती दिशाभूल करणाऱ्या हेडलाईन्स होत्या. पण तू यावर स्पष्टीकरण दिलंस आणि माफी मागितलीस, हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे. तुला पुढील कारकीर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा' अशा सदिच्छा हृतिकने अँजेलासाठी ट्विटरवर व्यक्त केल्या आहेत.
https://twitter.com/iHrithik/status/849222237295071232
सुझान खानशी घटस्फोट झाल्यानंतर हृतिक रोशनचं अभिनेत्री कंगना रनौतसोबत झालेल्या ईमेल वॉर रंगलं होतं. त्यानंतर हृतिक सतत चर्चांमध्ये राहणं टाळतो.