मुंबई : बॉलिवूड दिवा श्रद्धा कपूरचं नाव 'आशिकी 2' फेम अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत जोडलं जात होतं. त्यानंतर दिग्दर्शक, अभिनेता फरहान अख्तर आणि श्रद्धा कपूर यांच्यात जवळीक निर्माण झाल्याचं म्हटलं जात होतं. याच इर्षेतून एका पार्टीत फरहान आणि आदित्य एकमेकांशी भिडल्याची चर्चा आहे.
भट्ट कॅम्पच्या आशिकी 2 मधून श्रद्धा आणि आदित्य यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. हा चित्रपट जबरदस्त हिट झाल्यामुळे दोघांचंही करिअर बॉलिवूडमध्ये सेट झालं. भट्ट कॅम्पच्या 30 व्या वर्षपूर्ती निमित्त आयोजित पार्टीला दोघांनीही साहजिकच एकत्र हजेरी लावली.
पार्टीत आदित्य आणि श्रद्धा मधली वाढती जवळीक फरहान अख्तरच्या डोळ्यात खुपत असल्याचं म्हटलं जातं. 'डेक्कन क्रॉनिकल्स'च्या वृत्तानुसार फरहानने तात्काळ आदित्यला हटकलं. मात्र श्रद्धा पुढील प्रकार टाळण्यासाठी दोघांच्या मध्ये पडली.
त्यानंतर फरहानच्या घरी जाऊन तिने झाल्या प्रकाराबद्दल त्याची कानउघडणी केल्याचं म्हटलं जातं. आपली बाजू स्पष्ट करुन सांगतानाच याची पुनरावृत्ती टाळण्याचा इशाराही श्रद्धाने फरहान दिल्याचं वृत्त आहे.