मुंबई : बॉलिवूडमधील आघाडीच्या कलाकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत काढलेला सेल्फी सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला आहे. अभिनेता रणवीर सिंहने क्लिक केलेला हा सेल्फी सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

बॉलिवूडमधील ताज्या दमाच्या कलाकारांपैकी कोण या फोटोमध्ये नाही, असा प्रश्न पडतो. रणवीर सिंग, रणबीर कपूर, आयुषमान खुराना, राजकुमार राव, सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन, विकी कौशल, भूमी पेडणेकर, आलिया भट, एकता कपूर, रोहित शेट्टी आणि करण जोहर या सेल्फीमध्ये आहेत.

मनोरंजनाच्या माध्यमातून चांगल्या समाज आणि राष्ट्राची निर्मिती करण्यात सिनेउद्योगाचं असलेलं योगदान, या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत कलाकारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मनोरंजन विश्वासाठी जीएसटीत केलेल्या बदलांसाठीही यावेळी कलाकारांनी मोदींचे आभार मानले. चित्रपटाच्या तिकीटांवरील जीएसटीमध्ये कपात केल्याबद्दल करण जोहरने मोदींचे ट्विटरवरुन आभार व्यक्त केलं.


काही दिवसांपूर्वी मोदींनी चित्रपट निर्मात्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. यावेळी जीएसटीचे दर कमी करण्याचा निर्णय झाला. मात्र या बैठकीला महिला प्रतिनिधी नसल्याबद्दल सोशल मीडियावर टीका झाली होती. त्यानंतर आलिया, भूमी, एकता कपूर यांना यावेळी बैठकीला बोलावण्यात आलं.