मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' चित्रपटासाठी 'मणिकर्णिका' चित्रपटाची तारीख बदलण्यास अभिनेत्री कंगना राणावतने नकार दिला आहे. 25 जानेवारीला फक्त 'ठाकरे' सिनेमा रीलिज व्हावा, अशी मागणी करण्यात आली होती.


इम्रान हाश्मीची मुख्य भूमिका असलेल्या 'चीट इंडिया' चित्रपट आठवडाभर आधी प्रदर्शित करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता. मात्र 'मणिकर्णिका'बाबत कोणताही निर्णय जाहीर करण्यात आला नव्हता.

'कोणीच आपल्याला तारीख पुढे ढकलण्याबाबत संपर्क साधला नव्हता. मुळात 25 तारखेला दोन चित्रपट प्रदर्शित झाल्यास काहीही फरक पडणार नाही' असं कंगना म्हणाली. 'मणिकर्णिका' चित्रपटाच्या म्युझिक लाँचला ती बोलत होती.

'मणिकर्णिका' चित्रपटात कंगनासोबत अंकिता लोखंडे, वैभव तत्त्ववादी, मोहम्मद झीशान अय्युब यांच्या मुख्य भूमिका आहेत. दिग्दर्शक क्रिश आणि अभिनेता सोनू सूद यांनी चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यावर कंगनाने सिनेमाची सूत्रं हाती घेतली होती. 1857 च्या उठावावेळी झांशीची राणी लक्ष्मीबाई यांनी ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीला दिलेल्या लढ्यावर हा सिनेमा आधारित आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत प्रस्तुत, राऊटर्स एंटरटेनमेंट एलएलपी, वायकॉम 18 मोशन पिक्चर्स आणि कार्निव्हल मोशन पिक्सर्च निर्मित 'ठाकरे' हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे. नवाझुद्दीन सिद्दीकी या सिनेमात बाळासाहेबांची व्यक्तिरेखा साकारत असून मराठी भाषेसाठी अभिनेते सचिन खेडेकर यांनी आवाज दिला आहे. तर अभिनेत्री अमृता राव माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे.