मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकमध्ये त्यांच्या पत्नीची भूमिका कोण दिसणार, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे. 39 वर्षीय टीव्ही अभिनेत्री बरखा बिष्ट 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटात जशोदाबेन यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे.

बरखाने 2005 साली 'प्यार के दोन नाम, एक राधा एक श्याम' या हिंदी मालिकेतून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर काव्यांजली, कसौटी जिंदगी की, कैसा ये प्यार है, नामकरण अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.

बरखाने 'गोलियां की रासलीला राम-लीला', 'राजनीती' यासारख्या बॉलिवूडपटांमध्ये काम केलं आहे. टीव्ही अभिनेता इंद्रनील सेनगुप्तासोबत बरखाने 2008 साली लगीनगाठ बांधली होती.

चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार असून निर्मात्यांनी कलाकारांची नावं जाहीर केली आहेत. विवेक ओबेरॉय पंतप्रधानांची भूमिका करणार असून बमन इराणी, ​झरीना वहाब, बरखा बिष्ट सेनगुप्ता, मनोज जोशी आणि प्रशांत नारायणन यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत असतील.

सरबजीत, मेरी कोम सारख्या चरित्रपटाचे दिग्दर्शक ओमंग कुमार या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार असून संदीप सिंग या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाचं पोस्टर 7 जानेवारीला 23 भाषांमध्ये लाँच करण्यात आलं होतं.

मोदींच्या वैयक्तिक आणि राजकीय जीवनातील कोणकोणत्या बाबींवर प्रकाशझोत टाकला जाणार, हे येत्या काळात स्पष्ट होईल. लोकसभा निवडणुकांच्या आधी हा सिनेमा रिलीज होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.