मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या 'बदला' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 'बदला लेना सही नहीं होता, लेकिन हर बार माफ़ कर देना सही नहीं होता' या एका संवादातच 'बदला' चित्रपटाचा सार येतो.

गेल्या काही दिवसांपासून 'बदला' चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात येत होते. त्यामुळे बिग बी आणि तापसीच्या चाहत्यांना सिनेमाची उत्सुकता लागून राहिली होती. 'पिंक'नंतर या दोघांची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

'सच नज़र के सामने है, पर नज़र झूठ पर है' असं कॅप्शन देत आज अमिताभ बच्चन यांनी 'बदला' चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. 'बदला' हा 2016 मध्ये प्रदर्शित कॉन्ट्राटिइम्पो (द इन्विजेबल गेस्ट) या चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे.

विद्या बालनच्या 'कहानी', 'कहानी 2' सारख्या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या सुजॉय घोष यांनीच या चित्रपटाचंही दिग्दर्शन केलं आहे. लंडन, स्कॉटलंडमध्ये या सिनेमाचं शूटिंग झालं असून येत्या 8 मार्चला हा सिनेमा प्रदर्शित होईल.