Parth Bhalerao : अभिनेता पार्थ भालेराव (Parth Bhalerao) हा मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याचा 'बॉईज 3' (Boyz 3) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बालकलाकार म्हणून अभिनयक्षेत्रात पदार्पण करणाऱ्या पार्थने आता दिग्दर्शनातही पदार्पण केलं आहे.
पार्थ भालेरावचे दिग्दर्शनात पदार्पण
केन थेम्बा यांच्या लघुकथेवर आधारित 'हम दोनो और सूट' हे एकपात्री नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नाटकाच्या निमित्ताने अभिनेता पार्थ भालेराव दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. निरंजन पेडणेकर यांचे लेखन असणारे हे नाटक रितिका श्रोत्री (Ritika Shrotri) सादर करणार आहे.
दिग्दर्शनाबद्दल पार्थ भालेराव म्हणतो,"मला 'हम दोनो और सूट'ची कथा प्रचंड भावली. 1970 च्या काळातील ही कथा आहे. ही गोष्ट एका अशा कपलची आहे, ज्यांचे नवीनच लग्न झाले आहे, एकमेकांवर प्रेम आहे. तरी बायको नवऱ्याची फसवणूक करत आहे. आता ती असे का करते, हे नवऱ्याला कळल्यावर त्याची प्रतिक्रिया काय असते, या गोष्टीचा त्यांच्या नात्यावर काय परिणाम होतो, हे नाटकात पाहायला मिळणार आहे.
नातेसंबंध आणि फसवणूकीवर भाष्य करणारं नाटक
नातेसंबंध आणि फसवणूक यावर भाष्य करणारे 'हम दोनो और सूट' हे नाटक असून यात प्रेक्षकांना ब्लॅक कॉमेडी अनुभवायला मिळणार आहे. रितिकाने आपल्या अभिनयाने या व्यक्तिरेखेत रंगत आणली आहे. ही एक क्लासिक कलाकृती आहे. याचा पहिला प्रयोग 13 जानेवारी रोजी पुण्यातील दि बॉक्स येथे 9 वाजता होणार आहे.''
रितिका श्रोत्रीने साकारल्या पाच व्यक्तिरेखा
रितिका श्रोत्री म्हणते,"यापूर्वीही मी एकपात्री प्रयोग केला आहे. एका जागी प्रेक्षकांना एक तास खिळवून ठेवणे, हे मोठे कौशल्य आहे आणि ही ताकद कथेमध्ये असते. प्रत्येक क्षणी ही कथा अनपेक्षित वळण घेते. त्यामुळे प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहाते. आता पुढे काय होणार याची. ही कथाच अतिशय सुंदर आहे.या नाटकात मी पाच व्यक्तिरेखा साकारल्या आहेत".
पार्थ भालेरावबद्दल जाणून घ्या...
पार्थ भालेरावने 2014 साली ' भूतनाथ रिटर्न्स' या सिनेमाच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं. पहिल्याच सिनेमात तो बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसला. किल्ला, बॉईज, बांबू, तुकाराम, असे त्याचे अनेक सिनेमे गाजले आहे. मराठीसह त्याने हिंदी मनोरंजनसृष्टीही गाजवली आहे.
संंबंधित बातम्या