Pankaj Tripathi on Main Atal Hoon : बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांचा 'मैं अटल हूं' (Main Atal Hoon) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या सिनेमावर आरोप होतील, टीका होईल, असं पंकज त्रिपाठी नुकत्याच एका मुलाखतीत म्हणाले आहेत.


आज तकला दिलेल्या मुलाखतीत अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारण्याबद्दल पंकज त्रिपाठी भूमिकेबद्दल म्हणाले,"अटल बिहारी वाजपेयी यांच्याबद्दल तुम्ही ऐकलं आहे. कविता ऐकल्या आहेत. पण त्यांची गोष्ट मात्र तुम्हाला माहिती नाही आणि हिच गोष्ट आता आम्ही तुमच्या भेटीला घेऊन येत आहोत. मी माझ्या पद्धतीने अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली आहे. त्यांच्या भूमिकेला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न मी केला आहे. या भूमिकेनंतर मी आधीपेक्षा शांत झालो आहे". 


'मैं अटल हूं' राजकारणावर आधारित? 


'मैं अटल हूं' सिनेमाबद्दल बोलताना पंकज त्रिपाठी म्हणाले,"मैं अटल हूं' हा सिनेमा राजकारणावर आधारित नसून राजकीय व्यक्तीमत्त्वावर आधारित आहे. अटल बिहारी वाजपेयी कवी होते. पण त्यांचं आयुष्य  राजकारणासोबत जोडलं गेलं होतं. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीची झलक दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे". 


'मैं अटल हूं' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा रवी जाधवने (Ravi Jadhav) सांभाळली आहे. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान पंकज त्रिपाठी यांनी कोणत्या सीनसाठी सर्वाधिक रिटेक घेतले याबद्दल बोलताना ते म्हणाले,"अटल बिहारी वाजपेयी यांना कॉपी करायचं नाही हे आम्ही सुरुवातीलाच ठरवलं होतं. त्यांच्या कविता या कठीण टास्क होता. त्यासाठीच सर्वाधिक रिटेक घेतले गेले असतील. 


'मैं अटल हूं'वर आरोप होतील : पंकज त्रिपाठी


'मैं अटल हूं' सिनेमाबद्दल बोलताना पंकज त्रिपाठी म्हणाले,"मैं अटल हूं' हा सिनेमा म्हणजे खूप मोठी जबाबदारी आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचं आयुष्य दोन तासांच्या सिनेमात कसं उलगडेल? त्यासाठी सहा सीझनच्या वेबसीरिजची आवश्यकता आहे. सिनेमावर रिलीज झाल्यावर आरोप होणार, टीका होईल, याचा आम्हाला अंदाज आहे". 


राम मंदिर प्राण प्रतिष्ठा अन् सिनेमाच्या रिलीज  डेटचं कनेक्शन? 


राम मंदिर प्राण प्रतिष्ठा 22 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. तर 'मैं अटल हूं' हा सिनेमा 19 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल. याबद्दल बोलताना पंकज त्रिपाठी म्हणाले,"राम मंदिर प्राण प्रतिष्ठा आणि सिनेमाच्या रिलीज डेटचं कनेक्शन नाही. आधी हा सिनेमा त्यांच्या जयंतीला अर्थात 25 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित होणार होता. पण VFX चं काम पूर्ण न झाल्याने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली". 


संबंधित बातम्या


Pankaj Tripathi : पंकज त्रिपाठींना राजकारणात करायचं होतं करिअर; 'त्या' घटनेने बदलला निर्णय