Palyad Teaser:  फोर्ब्ससारख्या जागतिक किर्तीच्या मासिकानं दखल घेतलेला, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि पुरस्कार सोहळ्यांमध्ये मानाचे समजले जाणारे सर्वच पुरस्कार आपल्या नावे करणाऱ्या 'पल्याड' (Palyad) या आगामी मराठी चित्रपटाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा आहे. मीडियापासून सोशल मीडियापर्यंत सर्वच ठिकाणी या चित्रपटावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला जात असल्यानं रसिकांनाही हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली आहे. हि उत्सुकता आणखी शिगेला पोहोचवणारा 'पल्याड'चा टिझर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाचा विषय, आशय आणि वातावरणाची झलक दाखवणारा 'पल्याड'चा टिझर सोशल मीडियावर केवळ धुमाकूळ घालत नसून, या चित्रपटात नेमकं काय पहायला मिळेल याचा अंतर्मुख होऊन विचार करायला लावतो. 4 नोव्हेंबर रोजी 'पल्याड' हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. 


चंद्रपुरातील व्हिजनरी व्यावसायिक व निर्माते पवन सादमवार, सुरज सादमवार, मंगेश दुपारे, प्रणोती पांचाळ आणि शैलेश भीमराव दुपारे यांनी एलिवेट फिल्म्स व एलिवेट लाईफ आणि लावण्य प्रिया आर्टसच्या बॅनरखाली 'पल्याड'ची निर्मिती केली आहे. के सेरा सेरा डिस्ट्रीब्युशनच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन शैलेश दुपारे यांनी केलं आहे. या चित्रपटात शंभू नावाच्या लहान मुलाची आणि त्याच्या आईच्या डोळ्यांत तरळणाऱ्या स्वप्नांची कथा पहायला मिळणार असल्याचे संकेत टिझर पाहिल्यावर मिळतात. परिस्थिती हालाखीची असली तरी आपल्या मुलानं शिकून मोठा डॅाक्टर व्हावं आणि शरीरासोबत लोकांच्या मनाचाही इलाज करावा असं शंभूच्या आईला वाटत असतं. आईच्या या स्वप्नांच्या पल्याड जे असतं त्याची कथा या चित्रपटात पहायला मिळणार असल्याचं टिझर पाहिल्यावर जाणवतं. 'उंच उंच उडू आज, आभाळात फिरू...' या लहान मुलांनी म्हटलेल्या गाण्यातील स्वप्नांना पंख बहाल करणारे शब्द संपूर्ण टिझरभर व्यापून उरतात. बालपणातील अल्लड स्वप्नं या गाण्याच्या माध्यमातून शब्दबद्ध करण्यात आली आहेत. शाळेतील गणवेषात गाणं म्हणणारी मुलं, झाडाला बांधलेल्या टायरच्या झुल्यावर घेतले जाणारे झोके, नदीच्या पाण्यात यथेच्छ डुंबणं, टायरची गाडी करून ती काठीनं हाकलणं, आभाळाच्या छताखाली गोल-गोल गिरक्या घेणं, गवताच्या गंजीवर मनसोक्त उड्या मारणं हे गावात राहणाऱ्या लहान मुलांना आनंद देणारे क्षण 'पल्याड'च्या टिझरमध्ये अलगदपणे सादर करण्यात आले आहेत. 



या चित्रपटाची कथा स्मशानजोगी समाजातील परिवाराभोवती गुंफण्यात आली आहे. आजच्या प्रगत युगातही समाजातील अंधाऱ्या कोपऱ्यात दडलेलं भीषण वास्तव दाखवण्याचं काम 'पल्याड' करणार आहे. आजवर कधीही न हाताळले गेलेले काही अप्रकाशित मुद्दे वास्तवदर्शी शैलीत सादर करण्यात आले आहेत. या चित्रपटानं जवळपास 14 चित्रपट महोत्सवांमध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवण्यात यश मिळवलं आहे. यात शशांक शेंडे, देविका दफ्तरदार, बल्लारशहामधील बाल कलाकार रुचित निनावे, देवेंद्र दोडके, वीरा साथीदार, सचिन गिरी, सायली देठे, भारत रंगारी, बबिता उइके, रवी धकाते, गजेश कांबळे आदींच्या कलाकारांनी अभिनय केला आहे. चित्रपटाची कथा सुदर्शन खडांगळे यांनी लिहिली असून, सुदर्शन खडांगळे आणि शैलेश भीमराव दुपारे यांनी पटकथा व संवादलेखन केले आहे. वेशभूषा विकास चहारे यांनी केली आहे. या चित्रपटाचं संपूर्ण चित्रीकरण चंद्रपूर जिल्ह्यात, 25 दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आलं आहे.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Palyad: मराठमोळ्या 'पल्याड' चित्रपटाचा डंका; आंतरराष्ट्रीय मासिक 'फोर्ब्स'ने घेतली दखल