इस्लामाबाद : पाकिस्तानी चाहत्याला किंग खान शाहरुख प्रेम चांगलंच महागात पडलं आहे. कारण या चाहत्याला थेट जेलची हवा खावी लागली आहे.


 

काय आहे प्रकरण?

पेशावरमध्ये राहणारा जहांगीर खान हा शाहरुखचा मोठा फॅन आहे. शाहरुखसाठी वाट्टेल ते करण्यासाठी तो तयार आहे. शाहरुख प्रेमातून जहांगीरने त्याला हरणाच्या कातड्याची चप्पल पाठवण्याचा निर्णय घेतला.

 

शाहरुखला खास पेशावरी सँडल गिफ्ट करण्यासाठी जहांगीरने चर्मकाराची भेट घेतली. जहांगीरने शाहरुखसाठी दोन जोड बनवण्यास सांगितलं. चप्पल जोडी शाहरुखला पाठवण्यापूर्वीच त्याने मीडियात याबाबतची घोषणा केली. ते ऐकून वनअधिकाऱ्यांनी तातडीने पोलिसात धाव घेऊन जहांगीरची तक्रार केली. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली.

 

पोलिसांच्या मते, "जहांगीर हा शाहरुखचा मोठा फॅन आहे. बॉलिवूडच्या या अभिनेत्याला एक खास भेट देण्याचा त्याने निर्णय घेतला. इतकंच नाही तर त्याने हरणाच्या कातडीचं चप्पल बनवलं. मात्र वनअधिकाऱ्यांच्या तक्रारीमुळे जहांगीरला अटक करावी लागली."

 

जहांगीरने हरणाच्या कातड्याची चप्पल बनवली की नाही याची आता चौकशी होऊन, त्याच्यावर खटला चालणार आहे.