मुंबई : दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांचा ‘पद्मावती’ सिनेमा सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आता प्रदर्शनाच्या आधीच या सिनेमाने अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे. ‘बाहुबली 2’ आणि ‘दंगल’ सारख्या सुपर-डुपर सिनेमांना मागे टाकून हा चित्रपट 150 देशांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा प्लॅन आहे.


180 कोटी रुपयांचं बजेट असलेला पद्मावती 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. भारतात 4500 स्क्रीन्सवर प्रदर्शित होणार आहे. तर जगभरात या सिनेमाच्या वितरणाची जबाबदारी हॉलिवूडचं फेमस स्टुडिओ पॅरामाऊंट पिक्चर्सकडे देण्यात आली आहे.

निर्मात्यांनी हा चित्रपट 150 देशांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा एक विक्रमच आहे. एवढ्या देशांमध्ये प्रदर्शित होणारा पद्मावती हा पहिलाच बॉलिवूड सिनेमा आहे. असं झाल्यास हा चित्रपट बाहुबली 2 आणि दंगलपेक्षाही जास्त कमाई करेल, असा विश्वास निर्मात्यांना आहे.

दीपिका पादूकोण, रणवीर सिंह आणि शाहिद कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा अमेरिका, यूके, फिजी, सिंगापूर, मलेशिया आणि आखाती देशात मोठ्या प्रमाणावर रिलीज केला जाणार आहे. तर चीनमध्येही चित्रपट रिलीज करण्याचा विचार आहे.