न्यूयॉर्क : बॉलिवूडची 'देसी गर्ल' अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्राची लोकप्रियता परदेशातही पाहायला मिळत आहे. 'फोर्ब्ज' मासिकाच्या शंभर सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये प्रियांकाचा समावेश झाला आहे.


फोर्ब्जनं मनोरंजन आणि मीडिया क्षेत्रातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत प्रियांकाला 15 वं स्थान दिलं आहे.  पॉपस्टार बियॉन्स चौथ्या, गायिका टेलर स्विफ्ट बाराव्या क्रमांकावर आहे. 'ऑल कॅटेगरी' मध्ये प्रियांका 97 व्या स्थानावर आहे.

फोर्ब्जच्या ऑल कॅटेगरीत जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्कल पहिल्या क्रमांकावर आहेत. सलग सात वर्ष त्यांनी अव्वल स्थान अबाधित राखलं आहे. 12 वर्ष त्यांनी या यादीत स्थान पटकावलं आहे.

यूकेच्या पंतप्रधान थेरेसा मा दुसऱ्या, पेप्सिकोच्या इंद्रा नूयी 11 व्या, हॅरी पॉटरची लेखिका जेके रोलिंग 13 व्या, बियॉन्स 50 व्या, तर गायिका टेलर स्विफ्ट 85 व्या स्थानावर आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांका ट्रम्पनेही थेट 21 वा क्रमांक लावला आहे.

फोर्ब्जने प्रियांका चोप्राचा अमेरिकन टीव्ही शो 'क्वाँटिको'ची तारीफ केली आहे. प्रियांका ही बॉलिवूडहून हॉलीवूडपर्यंत मजल मारणारी एक यशस्वी अभिनेत्री आहे, असे फोर्ब्सने म्हटलं आहे. विशेष म्हणजे फोर्ब्जच्या यादीत सर्वाधिक कमाई करणाऱ्या टीव्ही अभिनेत्रींमध्ये प्रियांका चोप्रा आठव्या स्थानावर आहे.