'पद्मावती'वर सेन्सॉर बोर्डाचा परस्पर निर्णय, राजघराण्याच्या सदस्याचा दावा
एबीपी माझा वेब टीम | 01 Jan 2018 11:53 AM (IST)
सेंसॉर बोर्ड अत्यंत बेजबाबदार असल्याचं सांगत त्यांनी पद्मावतीबाबत परस्पर निर्णय घेतल्याचा आरोप विश्वराज सिंह यांनी केला आहे.
मुंबई : संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावती' चित्रपटाला यू/ए प्रमाणपत्र देण्याची तयारी सेन्सॉर बोर्डाने दाखवली आहे, मात्र पद्मावतीचा वाद काही संपण्याची चिन्हं दिसत नाहीत. पूर्व मेवाड राजघराण्यातील सदस्य विश्वराज सिंह यांनी सीबीएफसीच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. सेंसॉर बोर्ड अत्यंत बेजबाबदार असल्याचं सांगत त्यांनी पद्मावतीबाबत परस्पर निर्णय घेतल्याचा आरोप विश्वराज सिंह यांनी केला आहे. 'सेंसॉर बोर्डाने सहा सदस्यीय समितीला बोलावलं होतं. आमचे काही प्रश्न होते. मात्र त्यानंतर आम्हाला समजलं की दुसऱ्याच एका समितीने चित्रपट पाहून मंजुरी दिली आहे. आमच्या संमतीशिवायच सिनेमाला हिरवा कंदिल दाखवण्यात आला. सेन्सॉर बोर्डाने अत्यंत बेजबाबदार काम केलं आहे.' पद्मावती चित्रपटाच्या नावात बदल करणं, हा निव्वळ दिखावा असल्याचा आरोप विश्वराज सिंह यांनी केला आहे. अशाप्रकारे 'पद्मावती'च्या निर्मात्या-दिग्दर्शकाप्रमाणेच सेन्सॉर बोर्डही देशाचा इतिहास, नायक आणि माझ्या कुटुंबाबत खोट्या कथेचा प्रचार करणारे एक ठरले आहे, असा दावाही विश्वराज सिंह यांनी केला. 'पद्मावती'चं 'पद्मावत' पद्मावती चित्रपटाला सर्टिफिकेट हवं असल्याचं त्याचं नामकरण 'पद्मावत' करावं अशी सूचना केंद्रीय चित्रपट निरीक्षण मंडळातर्फे देण्यात आली होती. इतिहास नाही, तर पद्मावत ही काल्पनिक कलाकृती या चित्रपटाच्या सर्जनशीलतेचा स्रोत असल्याचं दिग्दर्शकाने म्हटलं आहे. म्हणून भन्साळींना सिनेमाचं नावही पद्मावत ठेवण्यास सांगितल्याचं सेंसॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी म्हणाले होते. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावती' चित्रपटात एकही कट सुचवलेला नाही, अशी माहितीही प्रसून जोशी यांनी दिली. चित्रपटाला 'यू/ए' सर्टिफिकेट मिळावं, यासाठी पाच बदल सुचवले असल्याचं जोशी यांनी स्पष्ट केलं होतं. पद्मावती चित्रपटाच्या रीलिजवर गेल्या काही महिन्यांपासून अनिश्चिततेचं सावट आहे. सुचवलेले बदल दिग्दर्शकाने अंमलात आणल्यास चित्रपटाला 'यू/ए' सर्टिफिकेट मिळेल. म्हणजेच 12 वर्षांखालील मुलांना पालकांच्या सोबतीने हा चित्रपट थिएटरमध्ये पाहता येईल. कट नाही, पाच बदल 'सीबीएफसीने पद्मावती चित्रपटाला एकही कट सुचवलेला नाही. त्याचप्रमाणे चित्रपटापूर्वी डिस्क्लेमर देण्याच्या सूचना दिल्या आहेत. चित्रपटातील ऐतिहासिक घटना अचूक असल्याचा कोणताही दावा आम्ही करत नाही, अशी सूचना सिनेमाआधी देणं आवश्यक आहे.' असं प्रसून जोशींनी सांगितलं होतं. सतीच्या परंपरेचं कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही, असंही डिस्क्लेमर देण्यास दिग्दर्शकाला सांगण्यात आलं. घुमर या गाण्यातही बदल करण्याची सूचना सीबीएफसीने दिली होती. चित्रपटात दाखवलेल्या व्यक्तिरेखेचं वर्णन साजेसं व्हावं, यासाठी हा बदल सुचवल्याचं जोशींनी सांगितलं होतं. ऐतिहासिक वास्तूंशी निगडीत अयोग्य /दिशाभूल करणारे संदर्भ बदलून घ्यावेत, असंही सेन्सॉर बोर्डाने सुचवलं होतं. आम्ही सुचवलेले बदल 'पद्मावती'चे दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी मान्य केले आहेत, अशी माहितीही प्रसून जोशी यांनी दिली होती. विरोधामुळे प्रदर्शन लांबणीवर करणी सेना आणि काही राजकीय पक्षांनी विरोध केल्याने 'पद्मावती'संदर्भात वाद निर्माण झाला होता. राजपुतांच्या राणीचं चुकीचं चित्रण केल्याचा आरोप करत करणी सेनेने सिनेमाला विरोध केला आहे. 'पद्मावती' 1 डिसेंबर 2017 रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र दिग्दर्शक संजय लीला भन्साळींनी महिनाभर आधी हे रिलीज अनिश्चित काळासाठी पुढे ढकललं. केंद्रीय चित्रपट निरीक्षक मंडळाच्या बैठकीत निर्णय केंद्रीय चित्रपट निरीक्षक मंडळाने चित्रपट पाहिल्यानंतर बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सिनेमाशी संबंधित वाद संपावा, असा यामागचा उद्देश आहे. सेन्सॉर बोर्डाच्या विशेष समितीमध्ये उदयपूरचे अरविंद सिंह मेवाड, डॉ. चंद्रमणी सिंह, जयपूर विद्यापीठाचे प्राध्यापक के.के सिंह यांचा समावेश होता. 28 डिसेंबरला सेन्सॉर बोर्डाची बैठक झाली. सेन्सॉर बोर्डाची पुढील बैठक जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. त्यावेळी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली जाईल, असं सेन्सॉर बोर्डाने म्हटलं आहे.