मुंबई : दीपिका पदुकोनच्या बहुप्रतीक्षित 'पद्मावती' चित्रपटातलं 'घुमर' हे पहिलं गाणं रीलिज झालं आहे. राजपुत समाजातील घुमर या पारंपरिक नृत्यशैलीवर आधारित या गाण्यात दीपिकाचा अनोखा अंदाज पहायला मिळत आहे.


घुमना या हिंदी शब्दावर 'घुमर' हा नृत्यप्रकार आधारित आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी घुमर गाणं संगीतबद्ध केलं असून सुरेल गायिका श्रेया घोषालच्या आवाजात हे गाणं ऐकायला मिळणार आहे.

घुमर नृत्यात पारंगत कोरिओग्राफर ज्योती तोमर यांनी गाण्याचं नृत्य दिग्दर्शन केलं आहे. ज्योती तोमर या घुमरचं प्रमाणित प्रशिक्षण देणारी एकमेव संस्था चालवतात. राजस्थानमधील किशनगडच्या दिवंगत राजमाता गेवर्दन कुमारीजी यांनी ही संस्था स्थापन केली होती.

आरशाद्वारे मुखदर्शन देणारी राणी पद्मावती कोण होती?


'हे सर्वात कठीण गाणं होतं. सिनेमाचं शूटिंग याच गाण्यापासून सुरु झालं. मी तो दिवस कधीच विसरु शकणार नाही. मला असं वाटलं की पद्मावतीच माझ्या अंगात संचारली आहे.' असं दीपिकाने मीडियाशी बोलताना सांगितलं.

बाजीराव मस्तानी या चित्रपटातील 'मस्तानी' हे गाणंही भन्साळी-श्रेया-दीपिका याच त्रिकूटाने दिलं होतं.

'पद्मावती'त रणवीर सिंगच्या प्रियकराच्या भूमिकेत जिम सर्भ?


एक डिसेंबर 2017 रोजी पद्मावती सिनेमागृहांमध्ये झळकेल. राणी पद्मिनी अर्थात पद्मावतीच्या भूमिकेत दीपिका पदुकोन, शाहिद कपूर राजा रतन सिंह म्हणजे राणी पद्मिनीच्या पतीच्या भूमिकेत आहे. अदिती राव हैदरीही या चित्रपटात झळकणार आहे.

'पद्मावती'तील दीपिकाचा फर्स्ट लूक, रीलिज डेटही निश्चित!


पद्मावती चित्रपटात रणवीर सिंग अल्लाउद्दिन खिल्जीच्या भूमिकेत आहे. रणवीर सिंग पहिल्यांदाच खलनायकाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. गोलियोंकी रासलीला-रामलीला, बाजीराव मस्तानी या चित्रपटांनंतर दीपिका-रणवीर ही जोडी तिसऱ्यांदा ऑनस्क्रीन एकत्र दिसणार आहे.

दिल्लीचा शक्तिशाली सुलतान असलेल्या अल्लाउद्दिन खिल्जीचा जीव राणी पद्मावतीवर जडला होता. या प्रेमातूनच त्याने तिच्या राज्यावर हल्लाबोल केला होता. मात्र त्याला शरण जाण्याऐवजी पद्मावतीने देहत्याग करणं पसंत केलं.

भन्साली यांचा हा चित्रपट सुरुवातीपासूनच अनेक अडथळ्यांचा सामना करत आहे. आधी भन्साली निर्मात्यांचा शोध घेत होते. यानंतर जयपूरमध्ये शूटिंगदरम्यान विरोध झाला होता, तर खुद्द भन्सालींना मारहाणही करण्यात आली होती.

पाहा व्हिडिओ :