'पद्मावती'चं नाव बदलण्याची शक्यता, नवं नाव...
एबीपी माझा वेब टीम | 30 Dec 2017 02:37 PM (IST)
करणी सेना आणि काही राजकीय पक्षांनी विरोध केल्याने 'पद्मावती'संदर्भात वाद निर्माण झाला होता. राजपुतांच्या राणीचं चुकीचं चित्रण केल्याचा आरोप करत करणी सेनेने सिनेमाला विरोध केला आहे.
नवी दिल्ली : बहुप्रतिक्षीत आणि वादात अडकलेल्या संजय लीला भन्साली यांच्या 'पद्मावती' सिनेमाचं नाव बदलणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सिनेमाचं नाव 'पद्मावती'ऐवजी 'पद्मावत' होण्याची शक्यता आहे. काही बदलांसह चित्रपट लवकरच प्रदर्शित करता येणार आहे. 'पद्मावती' चित्रपटाचं नाव आणि घुमर गाण्यात बदल केल्यानंतर हा सिनेमा प्रदर्शित केला जाऊ शकतो, असं सेन्सॉर बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. विरोधामुळे प्रदर्शन लांबणीवर करणी सेना आणि काही राजकीय पक्षांनी विरोध केल्याने 'पद्मावती'संदर्भात वाद निर्माण झाला होता. राजपुतांच्या राणीचं चुकीचं चित्रण केल्याचा आरोप करत करणी सेनेने सिनेमाला विरोध केला आहे. 'पद्मावती' 1 डिसेंबर 2017 रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र दिग्दर्शक संजय लीला भन्साळींनी महिनाभर आधी हे रिलीज अनिश्चित काळासाठी पुढे ढकललं. केंद्रीय चित्रपट निरीक्षक मंडळाच्या बैठकीत निर्णय सेन्सॉर बोर्डने स्थापन केलेल्या केंद्रीय चित्रपट निरीक्षक मंडळाने चित्रपट पाहिल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. सिनेमाशी संबंधित वाद संपावा, असा यामागचा उद्देश आहे. सेन्सॉर बोर्डाच्या विशेष समितीमध्ये उदयपूरचे अरविंद सिंह मेवाड, डॉ. चंद्रमणी सिंह, जयपूर विद्यापीठाचे प्राध्यापक के.के सिंह यांचा समावेश होता. 28 डिसेंबरला सेन्सॉर बोर्डाची बैठक झाली. बदल केल्यानंतर सिनेमाला U/A प्रमाणपत्र दिलं जाईल, असं सेन्सॉर बोर्डाने सांगितलं आहे. तसंच चित्रपटात डिस्क्लेमर असणं बंधनकारक आहे, अशी स्पष्ट सूचनाही करण्यात आली आहे. सेन्सॉर बोर्डाची पुढील बैठक जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. त्यावेळी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली जाईन, असं सेन्सॉर बोर्डाने म्हटलं आहे. दीपिका, शाहिद आणि रणवीर प्रमुख भूमिकेत राणी पद्मिनी अर्थात पद्मावतीच्या भूमिकेत दीपिका पादूकोण असून शाहिद कपूरने राजा रतन सिंह म्हणजे राणी पद्मिनीच्या पतीची व्यक्तिरेखा साकारली आहे. पद्मावती चित्रपटात रणवीर सिंग अल्लाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेत आहे. अदिती राव हैदरीही या चित्रपटात झळकणार आहे. रणवीर सिंह पहिल्यांदाच खलनायकाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. गोलियोंकी रासलीला-रामलीला, बाजीराव मस्तानी या चित्रपटांनंतर दीपिका-रणवीर ही जोडी तिसऱ्यांदा ऑनस्क्रीन एकत्र दिसणार आहे.