मुंबई : वर्सोवा बीचवरील अस्वच्छतेमुळे सर्वसामान्यांपासून सेलिब्रेटींपर्यंत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या बीचच्या सफाईसाठी पुढाकार घेणारे पर्यावरणप्रेमी अफरोज शाह यांना खुद्द अमिताभ बच्चन यांनी मदतीचा हात दिला आहे. बिग बींनी खोदकामासाठी एक्सकॅवेटर (जेसीबी) आणि ट्रॅक्टर भेट दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचे स्वच्छतादूत असलेल्या अमिताभ बच्चन यांनी वर्सोवा बीचच्या स्वच्छतेसाठी हातभार लावला आहे. ट्विटरवर फोटो शेअर करुन बिग बींनी ही माहिती दिली आहे.



'एखाद्या सत्कार्यासाठी हातभार लावण्याचा आनंद वेगळाच असतो. मी आज केलेलं काम हा आयुष्यातील सर्वात समाधानकारक अनुभव होता. वर्सोवा समुद्र किनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी एक्सकॅवेटर आणि ट्रॅक्टर भेट दिला.' असं ट्वीट अमिताभ बच्चन यांनी केलं आहे.


अफरोज शाह यांनीही बिग बींनी गिफ्ट दिलेल्या जेसीबी आणि ट्रॅक्टरचे फोटो शेअर केले आहेत. पर्यावरणविरोधी लढ्यात तुम्ही आशेचा किरण आहात, अशा शब्दात शाहांनी बच्चन यांचे आभार मानले.



यापूर्वी अनुष्का शर्मा, रणदीप हुडा, दिया मिर्झा यासारख्या सेलिब्रेटींनीही वर्सोबा बीचच्या स्वच्छतेसाठी आवाज उठवला आहे.