मुंबई : ‘पद्मावत’ सिनेमाला आमचा विरोध नसल्याची भूमिका काल मनसेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी जाहीर केली होती. महाराष्ट्रात पद्मावतला पाठिंबा असल्याची माहिती शालिनी ठाकरेंनी माध्यमांना दिली होती. मात्र, आज अशी कुठलीही भूमिका मनसेची नसल्याचं मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी म्हंटलं आहे.
‘पद्मावत’ संदर्भात शालिनी ठाकरेंचं वैयक्तिक मत असल्याचं खोपकर म्हणाले. ‘पद्मावतला विरोधही नाही आणि समर्थनही नाही. कुठलाही सिनेमा पाहिल्याशिवाय त्याला विरोध करु नये अशी मनसेची भूमिका आहे.’अशी प्रतिक्रिया एबीपी माझाशी बोलताना खोपकर यांनी दिली.
दरम्यान, एकाच पक्षाच्या दोन वेगळ्या भूमिका समोर आल्यानंतर मनसेत मतमतांतरे असल्याचं यानिमित्ताने समोर आलं आहे.
'पद्मावत'चा वाद काय?
राजपूत करणी सेना आणि काही राजकीय पक्षांनी विरोध केल्याने 'पद्मावती' संदर्भात वाद निर्माण झाला होता. राजपुतांच्या राणीचं चुकीचं चित्रण केल्याचा आरोप करत करणी सेनेने सिनेमाला विरोध केला आहे.
हा सिनेमा अंशतः ऐतिहासिक घटनांवर आधारित असल्याचं सिनेकर्त्यांनी सांगितल्यामुळे केंद्रीय चित्रपट निरीक्षक मंडळाने इतिहासतज्ज्ञ आणि राजघराण्यातील काही व्यक्तींना पद्मावती पाहण्यासाठी निमंत्रित केलं होतं. निर्मात्यांनी 'पद्मावती अंशतः ऐतिहासिक घटनांवर आधारित' असल्याचं सांगून संकट ओढावून घेतल्याचं सेन्सॉर बोर्डाने म्हटलं होतं.
'पद्मावती काल्पनिक आहे की ऐतिहासिक घटनांवर आधारित' यासंबंधी विचारणा करणारा फॉर्ममधील भाग रिकामा ठेवल्यामुळे सेन्सॉर बोर्डाने सिनेमाची कॉपी निर्मात्यांना परत पाठवली होती.
पद्मावती ते पद्मावत
पद्मावती चित्रपटाला सर्टिफिकेट हवं असल्याचं त्याचं नामकरण 'पद्मावत' करावं अशी सूचना केंद्रीय चित्रपट निरीक्षण मंडळातर्फे देण्यात आली होती. हा चित्रपट ऐतिहासिक नसून, पद्मावत ही काल्पनिक कलाकृती या चित्रपटाच्या सर्जनशीलतेचा स्रोत असल्याचं दिग्दर्शकाने म्हटलं आहे. म्हणून भन्साळींना सिनेमाचं नावही पद्मावत ठेवण्यास सांगितल्याचं सेंसॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी म्हणाले होते.
सतीच्या परंपरेचं कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही, असंही डिस्क्लेमर देण्यास दिग्दर्शकाला सांगण्यात आलं होतं.
चित्रपटाचं नाव बदलून 'पद्मावत' आणि काही दृश्यांत बदल केल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने यू/ए सर्टिफिकेट दिलं. 'Padmavati' पासून सुरु झालेला या टायटलचा प्रवास व्हाया 'Padmavat' आता 'Padmaavat' वर पोहचला आहे.
घूमरचं नवं व्हर्जन
दीपिकाच्या ‘घूमर’ गाण्याचंही नवं व्हर्जन रिलीज करण्यात आलं आहे. आधी या गाण्यात दीपिकाची कंबर दिसत होती. मात्र सेन्सॉर बोर्डाने सुचवलेल्या बदलांनंतर नव्या गाण्यात दीपिकाची कंबर झाकण्यात आली आहे. शिवाय यूट्यूबवरुनही जुनं गाणं हटवण्यात आलं आहे. गाण्यात ज्या ठिकाणी दीपिकाची कंबर दिसत आहे, ते कम्युटर ग्राफिक्सच्या माध्यमातून लपवलं आहे.
चार राज्यांचा विरोध
राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा या चार राज्यांनी सिनेमाच्या रीलिजवर बंदी घातली. याविरोधात निर्मात्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यावर कोर्टाने ही बंदी अवैध असल्याचं सांगितलं. 'पद्मावत' प्रदर्शित झाल्यावर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही राज्य सरकारची जबाबदारी असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे.
'पद्मावती' 1 डिसेंबर 2017 रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र दिग्दर्शक संजय लीला भन्साळींनी महिनाभर आधी हे रिलीज अनिश्चित काळासाठी पुढे ढकललं. अखेर 25 जानेवारी 2018 रोजी हा चित्रपट 'पद्मावत' नावाने प्रदर्शित होणार आहे.
दीपिका, शाहिद आणि रणवीर प्रमुख भूमिकेत
राणी पद्मिनी अर्थात पद्मावतीच्या भूमिकेत दीपिका पदुकोन असून शाहिद कपूरने राजा रतन सिंह म्हणजे राणी पद्मिनीच्या पतीची व्यक्तिरेखा साकारली आहे. पद्मावत चित्रपटात रणवीर सिंग अल्लाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेत आहे. अदिती राव हैदरीही या चित्रपटात झळकणार आहे.
रणवीर सिंह पहिल्यांदाच खलनायकाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. गोलियोंकी रासलीला-रामलीला, बाजीराव मस्तानी या चित्रपटांनंतर दीपिका-रणवीर ही जोडी तिसऱ्यांदा ऑनस्क्रीन एकत्र दिसणार आहे.