मुंबई : संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावत' चित्रपट पाहून प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. मात्र रणवीर सिंगने साकारलेल्या अल्लाउद्दीन खिल्जीच्या व्यक्तिरेखेला सर्वांनीच मनापासून दाद दिली आहे. यासोबतच रणवीरच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. भारतातील कमाईत 200 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करणारा रणवीर सिंग हा सर्वात तरुण अभिनेता ठरला आहे.


पद्मावत चित्रपटाने सोमवार (5 फेब्रुवारी) पर्यंत देशात 219 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पद्मावत हा चित्रपट जितका पद्मावती साकारणाऱ्या दीपिकाचा आहे, तितकाच, किंबहुना तिच्यापेक्षा जरासा जास्तच खिल्जी साकारणाऱ्या रणवीर सिंगचा आहे.

वयाच्या 32 व्या वर्षी रणवीरने 200 कोटींच्या क्लबमध्ये शिरणारा सर्वात तरुण अभिनेता होण्याचा मान पटकवला आहे. चित्रपट अभ्यासक रमेश बाला यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.


अल्लाउद्दीन खिल्जीची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी रणवीर सिंगने कठोर मेहनत घेतली आहे. फक्त शारीरिकच नाही, तर मानसिकदृष्ट्याही त्याला तयारी करावी लागली. प्रेक्षक आणि समीक्षकांच्या प्रतिसादामुळे रणवीरला झोकून देऊन काम केल्याचं चीज झाल्यासारखं वाटत आहे.

आतापर्यंत अनेक चित्रपटांचा समावेश 200 कोटींच्या क्लबमध्ये झाला आहे. दंगल, पीके, बाहुबली 2, सिक्रेट सुपरस्टार, बजरंगी भाईजान हे चित्रपट ऑल टाईम कलेक्शनमध्ये पहिल्या पाचात आहेत. त्याशिवाय सुलतान, टायगर जिंदा है, धूम 3, चेन्नई एक्स्प्रेस, प्रेम रतन धन पायो, 3 इडियट्स यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

भारतीय बॉक्स ऑफिसवर दोनशे कोटींच्या क्लबमध्ये गेलेल्या चित्रपटांमध्ये आमीर खान, सलमान खान, शाहरुख खान या पन्नाशीतील तीन खान मंडळींचं वर्चस्व आहे. त्याशिवाय अक्षय कुमार, प्रभास, हृतिक रोशन, सैफ अली खान, अजय देवगन या अभिनेत्यांचे प्रत्येकी एखाद-दुसरे सिनेमे आहेत.

आतापर्यंत 200 कोटींच्या क्लबमध्ये जाणाऱ्या बाहुबली (1 आणि 2) चा 38 वर्षीय प्रभास या यादीतील सर्वात तरुण अभिनेता होता. (बाहुबली चित्रपट बॉलिवूडचा नसला, तरी भारतीय आहे) तर बॉलिवूडपटांबद्दल बोलायचं झाल्यास 44 वर्षीय हृतिकचं नाव घेता येईल. मात्र रणवीर या सर्वांमध्ये सर्वात तरुण ठरला आहे