नवी दिल्ली : आगामी पॅडमॅन या सिनेमाचा गर्व असल्याचं अभिनेता अक्षय कुमारने म्हटलं आहे. नेहमीच सामाजिक विषयांवरील सिनेमा करण्याची इच्छा होती. मात्र पैसा नसल्यामुळे करु शकलो नाही, असं अक्षय कुमारने म्हटलं आहे.
''सॅनिटरी पॅडवर आतापर्यंत एकही व्यावसायिक सिनेमा बनवण्यात आला नाही. हॉलिवूडमध्येही असा सिनेमा नाही. कारण, लोक अशा विषयावर जाहीरपणे बोलतही नाहीत,'' असं तो म्हणाला.
'पॅडमॅन'च्या प्रमोशनदरम्यान अक्षय कुमार बोलत होता. ''नेहमीच सामाजिक विषयांवर सिनेमा करण्याची इच्छा होती. मात्र तेव्हा मी निर्माता नव्हतो आणि आवश्यक तेवढा पैसाही नव्हता. मात्र आता हे काम करु शकतो. पत्नी ट्विंकल खन्नाने अरुणाचलम मुरुगनाथम यांच्याविषयी माहिती दिली. त्यानंतर दिग्दर्शक आर. बाल्की यांची भेट घेतली आणि सिनेमावर विचार सुरु केला,'' अशी माहितीही अक्षय कुमारने दिली.
''सॅनिटरी पॅड किंवा मासिक पाळीवर हॉलिवूडमध्येही आतापर्यंत सिनेमा झालेला नाही. लोक नेहमी याविषयी सांगतात, मात्र कुणीही व्यावसायिक सिनेमा बनवत नाहीत, कारण सर्व जण यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. आम्ही या दिशेने एक नवं पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला आहे,'' असं अक्षय कुमार म्हणाला.
अरुणाचलम मुरुगनाथमही या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यांनीही सिनेमाविषयी आपलं मत मांडलं. ''आपल्या कामावर आणि जीवनावर सिनेमा बनवला जाईल, याचा कधीही विचार केला नव्हता. जेव्हा मी ‘माहवारी’ शब्दाचा उल्लेख करायचो, तर लोक मारायचे. पण एक दिवस माझा जीवनपट बनेल, याचा विचार कधीही केला नव्हता,'' असं मुरुगनाथम म्हणाले.
9 फेब्रुवारी रोजी हा सिनेमा देशभरात रिलीज होणार आहे.