मुंबई : दीपिका पदूकोण, रणवीर सिंह आणि शाहीद कपूर स्टारर पद्मावत या सिनेमाने 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे. 100 कोटींची कमाई करणारा हा या वर्षातला पहिलाच सिनेमा आहे. या वीकेंडला 'पद्मावत'ने 110 कोटी रुपयांची कमाई केल्याची माहिती सिनेसमीक्षक रमेश बाला यांनी दिली आहे.

या सिनेमाने रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवारी 19 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी 32 कोटी रुपये आणि तिसऱ्या दिवशी 27 कोटी रुपयांची कमाई केली होती. रविवारी सिनेमाने 30 कोटींपेक्षा जास्त कमाई केली.

सिनेमाची एकूण कमाई आतापर्यंत 115 कोटी रुपये झाली आहे. बुधवारी झालेल्या पेड प्रीव्ह्यूमध्येही 'पद्मावत'ने 5 कोटींची कमाई केली होती.

दरम्यान, हा सिनेमा देशभरात रिलीज झालेला नाही. अन्यथा हा आकडा आणखी वाढला असता. करणी सेनेचा विरोध पाहता गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा या राज्यांमध्ये मल्टीप्लेक्स असोसिएशनने सिनेमा प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला होता.