सिनेमा पाहून निराशा, तमन्नावर चाहत्याने बूट फेकला
एबीपी माझा वेब टीम | 28 Jan 2018 11:33 PM (IST)
तमन्नाभोवती फॅन्सचा गराडा असल्यामुळे तो बूट एका कर्मचाऱ्याला लागला.
हैदराबाद : बाहुबली फेम अभिनेत्री तमन्ना भाटियावर एका चाहत्याने बूट फेकल्याचा प्रकार समोर आला आहे. तमन्नाचा चित्रपट न आवडल्यामुळे हैदराबादमधील या चाहत्याने थेट तिच्यावर बूट भिरकवला. तमन्ना हैदराबादच्या हिमायतनगरमध्ये एका ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेली होती. त्यावेळी 31 वर्षीय करिमुल्लाने दुकानातून बाहेर येणाऱ्या तमन्नावर बूट फेकला. तमन्नाभोवती फॅन्सचा गराडा असल्यामुळे तो बूट एका कर्मचाऱ्याला लागला. नारायणगुडा पोलिसांनी करिमुल्लाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. गेल्या काही दिवसात तमन्नाचे चित्रपट पाहून आपली घोर निराशा झाली, तिचा अभिनय आपल्यास पसंतीस पडला नाही, म्हणून हे पाऊल उचलल्याचं तो सांगतो. तमन्नाने बहुचर्चित बाहुबली आणि बाहुबली 2 चित्रपटात 'अवंतिका' ही व्यक्तिरेखा साकारली आहे. त्याशिवाय काही हिंदी, तामिळ आणि तेलुगू चित्रपटातही ती झळकली आहे. बूट लागलेल्या कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर करिमुल्लावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. करिमुल्ला मुशिराबादचा रहिवासी असून त्याचं बीटेकपर्यंत शिक्षण झालं आहे.