Padma Awards : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. सोनू निगम (Sonu Nigam) आणि 'पृथ्वीराज' चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी (Chandraprakash Dwivedi) यांना 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सोनू निगम आणि चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सोनू निगम म्हणाला,"25 जानेवारी हा दिवस माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खास होता. 'पद्मश्री' पुरस्कार मला जाहीर केल्याबद्दल मी भारत सरकारचा आभारी आहे. माझी आई शोभा निगम आणि माझे वडील आगम कुमार निगम यांचेही मी आभार मानू इच्छितो. खरं तर हा पुरस्कार मला माझ्या आईला समर्पित करायचा आहे. आज ती इथे असती तर खूप रडली असती. माझ्या प्रवासाचा एक भाग असलेल्या माझ्या कुटुंबियांचे मी आभार मानतो".
'पृथ्वीराज' चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी म्हणाले,"प्रतिष्ठित 'पद्मश्री' पुरस्कार मला जाहीर झाल्याने खूप आनंद झाला आहे. मी नेहमीच देशाच्या इतिहासातील आणि संस्कृती संदर्भातील विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हा पुरस्कार मी माझ्या देशाला समर्पित करतो".
व्हिक्टर बॅनर्जी, उस्ताद रशीद खान यांच्याशिवाय दिवंगत गायक गुरमीत बावा यांनादेखील पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच संगीतकार बालेश भजनंत्री, गायिका माधुरी भरतवाल, सोनू निगम, चित्रपट निर्माते चंद्रप्रकाश द्विवेदी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या