Pataudi Palace Lifestyle : नवाब खानांचा ‘पतौडी पॅलेस’ (Pataudi Palace) एखाद्या राजमहालापेक्षा कमी नाही. नुकत्याच एका मुलाखतीत सैफ अली खान (Saif Ali Kha) याची बहीण, बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान (Soha Ali Khan) हिने त्याच्या ‘पतौडी पॅलेस’च्या अनेक आठवणी जागवल्या आहेत. जेव्हा ‘पतौडी पॅलेस’मध्ये लाईट जायची, तेव्हा संपूर्ण खान कुटुंब पॅलेसच्या आवारात मच्छरदाणी लावून झोपायचे. यावेळी सोहाने अशा अनेक गोष्टी सांगितल्या, ज्या ‘पतौडी पॅलेस’ला मुंबईतील धकाधकीच्या जीवनापासून वेगळं ठरवतात.


तिच्या एका मुलाखतीत बोलताना सोहा अली खान म्हणाली की, ‘मी जेव्हाही पतौडी पॅलेसमध्ये पाऊल ठेवते, तेव्हा मला माझे वडील मन्सूर अली खान (Mansoor Ali Khan) यांचा सहवास जाणवतो. त्यांच्या आठवणी या पॅलेसने जपून ठेवल्या आहेत. इथे आले की, मी आवर्जून त्यांच्या कबरीजवळ जाते आणि त्यांच्यासोबत वेळ घालवते. हे घर माझ्या वडिलांचे आहे. त्यामुळे तिथे राहिल्याने एक वेगळाच दिलासा मिळतो.’



वीज नव्हती.. मच्छरदाणी बांधून झोपायचो!


सोहा म्हणते, ‘किती आठवणी आहेत या पॅलेसमध्ये.. एक काळ असा होता, जेव्हा आम्ही लहानपणी या पॅलेसमध्ये जायचो, त्यावेळी इथे वीज नव्हती. आम्ही बाहेर मच्छरदाणी बांधून त्यात झोपायचो. आता आमच्याकडे एसी आहे, पण त्याकाळी एसी नव्हते, मोबाईल फोनही नव्हते. त्यामुळे बाहेरच्या जगापासून संपर्क पूर्णपणे तुटायचा.’


या आठवणी जगवतान सोहा म्हणते, ‘आम्ही सगळे एकत्र क्रिकेट खेळायचो, सेंद्रिय शेती करायचो. इनाया देखील आता तिथे जाऊन काही रोपे लावते. आम्ही आमच्या पॅलेसमध्ये बटाटे, गाजर, भाज्या सर्व काही पिकवतो. स्वतः पिकवलेल्या काकडी, गाजर यांचे सॅलड बनवतो. यासोबतच या वाड्यात मोर आणि कुत्रेही आहेत, त्यांच्यासोबत निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची मजा काही औरच आहे.’ यावेळी सोहाने तिच्या बालपणीच्या अनेक आठवणी चाहत्यांसोबत शेअर केल्या. पतौडी पॅलेसच्या अशा गोष्टी सांगितल्या, ज्या चाहत्यांना नेहमी जाणून घ्यायच्या होत्या.


इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha