ओला, उबर लवकरच परिवहन कायद्याच्या चौकटीतः दिवाकर रावते
एबीपी माझा वेब टीम | 01 Sep 2016 09:38 AM (IST)
मुंबईः ओला आणि उबर या टॅक्सी सेवा लवकरच परिवहन कायद्याच्या अंतर्गत आणण्यात येणार आहेत. परिवहन कायद्याचे जे नियम आहेत, त्याच चौकटीत राहून त्यांना व्यवसाय करावा लागेल, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. टॅक्सी युनियनची परिवहन मंत्री, परिवहन आयुक्त आणि आरटीओ अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत रावते यांनी ही माहिती दिली. यासाठी मुख्यमंत्री आणि केंद्रीय परिवहन मंत्र्यांशी चर्चा झाली असल्याचंही रावते यांनी सांगितलं. परिवहन कायद्यांतर्गत वाहतूक सेवेसाठी जे नियम आहेत, ते ओला आणि उबर या सेवांवरही लागू होणार आहे. मात्र हा निर्णय कधीपासून लागू केला जाईल, याविषयी अद्याप कसलीही माहिती देण्यात आली नाही. रिक्षा-टॅक्सी चालकांनी ओला, उबर टॅक्सीवर बंदी घालण्यासाठी संपाचं हत्यार उपसलं आहे. यासंबंधी टॅक्सी युनियनची आज रावते यांच्याशी बैठक झाली. परिवहन कायद्यांतर्गत टॅक्सीला शासनाकडून अधिकृत प्रवासी वाहतुकीचा परवाना दिला जातो. चालकाचे शिक्षण, चारित्र्य आणि इतर तपशील तपासला जातो. या तपशीलाची नोंद करून ठेवली जाते. या टॅक्सीचे भाडे शासन निश्चित करते. प्रत्येक टॅक्सीत भाडे मीटर असते. प्रवाशांकडून कोणतेही अतिरिक्त अथवा स्वतंत्र पैसे घेतले जात नाही. त्यामुळे ओला उबर यांच्यासाठीही या नियमांची सक्ती होणार आहे.