मुंबई : प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूजासह दहा जणांविरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वारंट जारी केलं आहे. रेमोविरोधात पाच कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप करत एका प्रॉपर्टी डीलरने गुन्हा दाखल केला आहे. आता रेमोला अटक करण्यासाठी गाझियाबाद पोलिसांनी पोलीस महानिरीक्षकांकडे परवानगी मागितली आहे. प्रॉपर्टी डीलरने 2016 साली याप्रकरणी तक्रार नोंदवली होती.
रेमो डिसूजाने एक सिनेमा तयार करुन दुप्पट नफा मिळवण्याबाबत सांगून पैसे घेतले होते, असा आरोप प्रॉपर्टी डीलर सतेंद्र त्यागी यांनी केला. रेमोच्या सांगण्यावरुन मी पाच कोटी रुपये रेमोच्या सिनेमावर लावले होते. रेमोने 2013 मध्ये अमर... मस्ड डाय या सिनेमाावर ते पैसे गुंतवले. या सिनेमात जरीन खान आणि राजीव खंडेलवाल मुख्य भूमिकेत होते, असं तक्रारदार सतेंद्र त्यागी यांचं म्हणणं आहे.
रेमोने वर्षभरात 5 कोटींचे 10 कोटी परत करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र मी पैशाची मागणी केली त्यावेळी रेमोने मला अंडरवर्ल्डकडून जीवे मारण्याची धमकी दिली. धमकी देणाऱ्याने आपलं नाव प्रसाद पुजारी सांगितलं. तसेच मुंबई परत न येण्याची धमकीही दिली असल्याचा आरोप त्यागी यांनी केला.
गाझियाबाद कोर्टाना 23 सप्टेंबरला रेमोविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळे रेमो गाझियाबाद पोलीस आता रेमोला मुंबईहून ताब्यात घेऊन गाझियाबाद कोर्टात हजर करणार आहेत. त्यासाठी त्यांनी मेरठच्या पोलीस महानिरीक्षकांकडे परवानगी मागितली आहे.