मुंबई : प्रसाद ओक दिग्दर्शित 'हिरकणी' हा मराठी चित्रपट 24 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर बॉलिवूडचा बिग बजेट चित्रपट 'हाऊसफुल 4' हा 25 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. 'हाऊसफुल 4' मुळे हिरकणी चित्रपटाला चित्रपटगृह मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे 'हिरकणी' या मराठी चित्रपटाला चित्रपटगृह दिले नाहीत तर काचा फुटणार, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने दिला आहे.

मराठी चित्रपटाला चित्रपटगृह मिळावे, यासाठी मनसे चित्रपट सेना पुन्हा एकदा मैदानात उतरली आहे. 'हिरकणी'साठी मनसेच्या चित्रपट सेनेने चित्रपटगृह मालकांना खळखट्याकचा इशारा दिला आहे.

'हिरकणी'ला चित्रपटगृह मिळावे, यासाठी मनसेचे कार्यकर्ते उद्या (23 ऑक्टोबर)चित्रपटगृह मालकांची भेट घेणार आहेत. मराठी चित्रपटाला चित्रपटगृह मिळावी, तो आमचा हक्क आहे, अशी भूमिका मनसेने घेतली आहे. मराठी चित्रपटाला स्क्रीन्स मिळाल्या नाहीत तर खळखट्याक होईल, असा इशारा मनसेने दिला आहे.

अभिनेता प्रसाद ओक याने 'हिरकणी'चे दिग्दर्शन केले आहे. तर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या चित्रपटात हिरकणीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. लेखक आणि अभिनेता चिन्मय मांडलेकर याने हिरकणीची कथा कथा-पटकथा लिहिली आहे.

25 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या हाऊसफुलमध्ये अभिनेता अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, क्रिती सॅनन, पुजा हेगडे, क्रिती खरबंदा, नवाजुद्दीन सिद्दीकी, चंकी पांडे, शरद केळकर, राणा डुगुबट्टी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे बजेट तब्बल 75 कोटी रुपये इतके आहे.