मुंबई : ‘पद्मावत’ सिनेमावरुन देशभर धुमाकूळ सुरु असताना, मल्टिप्लेक्स असोसिएशनने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा या चार राज्यांमध्ये ‘पद्मावत’ सिनेमा पदर्शित न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


देशभरातील 75 टक्के मल्टिप्लेक्स मालक हे मल्टिप्लेक्स असोसिएशनचे सदस्य आहेत. करणी सेनेच्या कार्यकर्त्यांकडून ‘पद्मावत’ सिनेमाला होत असलेल्या तीव्र विरोधानंतर आणि हिंसक पद्धतीने केलेल्या निषेधानंतर असोसिएशनने खबरदारी म्हणून हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.

मल्टिप्लेक्स असोसिएशनचे अध्यक्ष दीपक अशेर यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले, “राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा या चार राज्यातील असोसिएशनच्या स्थानिक व्यवस्थापनाने आम्हाला कळवले आहे की, कायदा आणि सुव्यवस्था ठीक वाटत नाही. त्यामुळे सिनेमा प्रदर्शित करणार नाही.”

“आमच्यासाठी संरक्षण महत्त्वाचे असते. ज्यावेळी या चारही राज्यातील कायदा-सुव्यवस्था सिनेमा प्रदर्शनासाठी ठीक वाटेल, त्यानंतर प्रदर्शित करु. परिस्थिती बदलेल, पण या क्षणी तरी स्थिती ठीक वाटत नाही.”, असेही दीपक अशेर म्हणाले.

देशभरात मल्टिप्लेक्स असोसिएशनच्या सुमारे 1800 ते 2 हजार स्क्रीन आहेत. त्यामुळे चार राज्यातील प्रदर्शन बंद राहिल्यास ‘पद्मावती’ सिनेमाला फटका बसेल, यात शंका नाही.