Ramayana : बहुचर्चित 'रामायण' (Ramayana) या चित्रपटाच्या शुटींगला 2 एप्रिलपासून सुरुवात करण्यात आलीये. नितेश तिवारी (Nitesh Tiwari) या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून अनेक दिग्गज या चित्रपटात झळकणार आहेत. परंतु शुटींग सुरु झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच सेटवरचे फोटो आणि कलाकारांचे लूकही लीक झाले. नुकतच सेटवरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये रामायणाचा सेट दिसत होता.
अभिनेत्री आकृती सिंह हिच्या सोशल मीडिया हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. त्यानंतर दशरथाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल आणि लारा दत्त यांचे देखील लूक लीक झाले. या सगळ्यानंतर दिग्दर्शक नितेश तिवारी यांना एकच धक्का बसला. त्यांनंतर त्यांनी एक मोठा निर्णय घेतल्याची माहिती सध्या समोर येत आहे.
नितेश तिवारी यांचा निर्णय काय?
दरम्यान कलाकारांचे लूक आणि सेटवरचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नितेश तिवारी यांचा प्रचंड संताप झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे त्यांनी आता सेटवर नो फोन पॉलिसी लागू केलीये. जेव्हा सेटवरचे फोटो लीक झाले त्याचवेळी चाहत्यांनी यावर नितेश तिवारी यांना कठोर पावलं उचलण्यास सांगितलं होतं.
अभिनेत्यांसह सर्वांना लागू होणार हा नियम
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, सूत्रांनी दिलेल्या माहिती अशी आहे की, हे फोटो आणि व्हिडिओ लीक झाल्यानंतर नितेश तिवारी हे बरेच नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी सेटवरील कलाकारांसहित सर्वांना नो फोन पॉलिसी लागू केली आहे. त्याचप्रमाणे नितेश तिवारी यांच्या टीमने शुटींग सुरु झाल्यानंतर अतिरिक्त स्टाफ आणि क्रूला बाहेर थांबण्याचे निर्देश दिले आहेत. ज्यांचा सीन सुरु आहे ते कलाकार आणि आवश्यक तंत्रज्ञच फक्त सेटवर राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यावेळी इतरांच्या एन्ट्रीवरही बॅन लावण्यात आलं आहे.
'रामायण'मध्ये कोणते कलाकार झळकणार?
नितेश तिवारी 'रामायण' तीन भागात प्रदर्शित करणार असल्याची चर्चा आहे. अभिनेता रणबीर कपूर हा प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणार आहे आणि साई पल्लवी सीतेची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात सनी देओल हनुमानाची तर बॉबी देओल कुंभकर्णाची भूमिका साकारणार आहे. याशिवाय अभिनेता यश हा रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. रकुल प्रीत सिंह शूपर्णखा आणि विजय सेतुपती हा विभीषणाच्या भूमिकेत दिसणार आहे.