मुंबई : ख्यातनाम अभिनेत्री नीना गुप्ता आणि क्रिकेटपटू विव रिचर्ड्स यांची कन्या पतीपासून विभक्त होत आहे. फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताने पती मधू मंटेनापासून फारकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी आणि मधू पुन्हा एकत्र येऊ अशी आशा आहे, असंही मसाबाने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.


पालक आणि व्यावसायिक सल्लागारांशी सल्ला-मसलत करुन आपण 'ट्रायल सेपरेशन' करण्याचं ठरवल्याचं मसाबाने इन्स्टाग्रामवर जाहीर केलं. अत्यंत जड अंतकरणाने हा निर्णय घ्यावा लागत असल्याची खंतही मसाबाने व्यक्त केली आहे.

'वैयक्तिकपणे आणि स्वतंत्रपणे आम्हाला आयुष्यात ज्या गोष्टी हव्या आहेत, त्या करण्यासाठी आमच्या वैवाहिक संबंधांवर विनाकारण ताण येत आहे. त्यामुळे या नात्यातून काही काळ दूर जाण्याचा आणि आपल्याला आयुष्यात काय हवं आहे, हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न करु' असं मसाबा म्हणते

मी आणि मधू पुन्हा एकत्र येऊ अशी आशा आहे, असंही मसाबाने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये पुढे म्हटलं आहे.

मसाबा गुप्ताने 2015 मध्ये निर्माते मधू मंटेनासोबत विवाहगाठ बांधली होती. मसाबा ही वेस्ट इंडीजचे दिग्गज क्रिकेटपटू विव रिचर्ड्स आणि टीव्ही-चित्रपट अभिनेत्री नीना गुप्ता यांची कन्या आहे.